esakal | पुणे तिथे काय उणे! ज्यांच्या घरी चोरी केली त्यांच्याबरोबरच चोरटा गेला सहकुटुंब जेवायला
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News

पुणे तिथे काय उणे! ज्यांच्या घरी चोरी केली त्यांच्याबरोबरच चोरटा गेला सहकुटुंब जेवायला

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : बनावट चावीचा वापर करून गावाकडील ओळखीच्या व्यक्तीच्या घरातील पावणे दोन लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी करणा-यास लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. ज्यांच्या घरात चोरट्याने हात साफ केला होता त्यांना जेवण्यासाठी हॉटेलला बसवले. त्यानंतर त्यांच्या घरी येऊन चोरी केली. रवींद्र शेषराव अवधूत (वय ४०, मुळ रा. धामणगाव, बार्शी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत निवृत्त शिक्षक मोहन पंढरीनाथ ढोणे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपी आणि फिर्यादी यांचे कुटुंबीय एकत्र जेवणासाठी हॉटेलात गेले होते. अवधूत याने फिर्यादी यांना हॉटेलमध्ये बसवले व माझ्या मुलांना घेऊन येतो, असे सांगून तिथून निघाला. मात्र तो स्वतःच्या घरी न जाता थेट फिर्यादी यांच्या घरी गेला. त्याकडे फिर्यादी यांच्या घराची चावी होती. त्या चावीच्या सह्याने त्याने फिर्यादींच्या घरातील एक लाख ७३ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरले. त्यानंतर आरोपी मुलांना घेऊन पुन्हा हॉटेलला गेला. तिथे दोघांच्या कुटुंबीयांनी बरोबर जेवण केले व त्यानंतर ते आपापल्या घरी गेले. आपल्या घरात चोरी झाल्याचे दुस-या दिवशी सकाळी फिर्यादी यांना समजले.

सीसीटीव्हीमुळे चोराचा शोध :
चोरी झाल्याचे समजल्यानंतर फिर्यादी यांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात अवधूत हा त्यांना दिसला. चोरी त्यानेच केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादी यांनी याबाबत जाब विचारला. त्यावेळी अवधूत याने चोरी केल्याचे कबूल केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला त्याचे मुळ गाव धामणगाव येथून सापळा रचून अटक केली. चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी एक लाख ३३ हजार रुपयांचे दागिने त्याकडून जप्त करण्यात आले आहेत.

चांदीचे दागिणे केले परत, सोने देण्यास टाळाटाळ :
सीसीटीव्हीमुळे चोरीचे पितळ उघडे पडल्याने अवधूत याने चोरलेले चांदीची नाणी फिर्यादी यांना परत केली. तर उर्वरित दागिने देखील लवकरच परत करतो असे सांगितले. मात्र ते देण्यास टाळाटाळ केल्याने फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर, उपनिरीक्षक दादाराजे पवार, पोलिस नाईक सदाशिव गायकवाड, पोलिस अंमलदार रोहीदास पारखे, निखिल पवार, बाजीराव वीर, शिवाजी बनकर, युवराज धोंडे यांनी ही कारवाई केली.