खडकवासला-उजनी 'सी प्लेन'चा विचार तरी करा!

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्‍टोबर रोजी केवडिया ते अहमदाबाद अशी गुजरातमध्ये सी प्लेनची सेवा सुरू करण्यात आली. रस्त्यामार्गे हे अंतर २०० किलोमीटर म्हणजे तीन ते साडेतीन तासांचे आहे.

इंदापूर - उजनी धरणग्रस्त तसेच इंदापूर तालुक्‍याचे भाग्य उजळण्यासाठी उजनी जलाशय ते खडकवासला जलाशय असा ‘सी प्लेन’ (जल हवाई वाहतूक) प्रकल्प होणे गरजेचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्‍टोबर रोजी केवडिया ते अहमदाबाद अशी गुजरातमध्ये सी प्लेनची सेवा सुरू करण्यात आली. रस्त्यामार्गे हे अंतर २०० किलोमीटर म्हणजे तीन ते साडेतीन तासांचे आहे. मात्र, सी प्लेनद्वारे हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात कापले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा या सेवेस भरघोस प्रतिसाद मिळून अर्थकारण वृद्धी होणार आहे. 

इंदापूर परिसरातील १५० वर्षांचा आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त वालचंद उद्योग समूह, आंतरराष्ट्रीय सोनाई दूध प्रकल्प, नेचर दूध प्रकल्प, भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखाना, बिजवडी येथील कर्मयोगी शंकर रावजी पाटील सहकारी साखर कारखाना, शहाजीनगर येथील नीरा भीमा व शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो, वरकुटे बुद्रुक येथील सोनाई कृषी प्रकिया हा गूळ पावडर निर्मिती कारखाना, उजनी पाणलोट क्षेत्रातील गोड्या पाण्यातील मासे, गंगावळण येथील काम सुरू असलेले निसर्ग पर्यटन केंद्र, लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत लक्षात घेऊन पर्यटन विकास झाल्यास उजनीकाठाला नवीन वैभव प्राप्त होईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पर्यटनस्थळ विकसित झाल्यामुळे रिसॉर्ट, हॉटेल्स, टूरिस्ट या व्यवसायांना देखील चालना मिळेल. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हजारो लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. 

उजनीलगत शेकडो एकर जमिनीवर कृष्णा नदीवरील वृद्धांवन गार्डन सारखे गार्डन करता येईल. कृषी पर्यटन केंद्र अशा प्रकारची पर्यटन स्थळे विकसित करून उजनी धरण ते खडकवासला धरण जलाशय अशी सी प्लेन सेवा सुरू केल्यास बारामती, इंदापूर, माढा, करमाळा, दौंड तालुक्‍यातील ऐतिहासिक, धार्मिक स्थळांना भेट देणे पर्यटकांना सोयीचे होईल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंदापूर तालुक्‍याची नैसर्गिक परिस्थिती चांगली आहे. उजनी धरणामुळे तालुक्‍यात कृषिधवल क्रांती झाली. मात्र, आता तालुका समृद्ध होण्यासाठी पर्यटन विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी उजनी ते खडकवासला जल हवाई प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून तातडीने करणे गरजेचे आहे.
- अतुल तेरखेडकर,    इंदापूर तालुका अभ्यासक

दृष्टिक्षेपात प्रकल्प
सी प्लेनला उड्डाण व उतरण्यासाठी जलाशयामध्ये अवघ्या तीनशे मीटरची जलपट्टी (धावपट्टी ) लागते
जलाशयाच्या कोणत्याही काठावर १५० फुटांची जेट्टी (छोटे बंदर) बांधल्यास सी प्लेन तेथे उतरू शकते
उजनी ते खडकवासला (पुणे) जलाशय एवढे अंतर जाण्यास सी प्लेनला अवघी २५ ते ३० मिनिटे लागतील
पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची केंद्र सरकारची भूमिका असल्यामुळे प्रकल्पाला केंद्र सरकारची भरीव आर्थिक मदत मिळू शकते

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बघण्यासारखी ठिकाणे 
उजनी धरण परिसरात भिगवण, भादलवाडी ते हिंगणगाव, नरसिंहपूर परिसरात ५४ गावांत येणारे ३५० परदेशी, स्थानिक पक्षी
कळस ते कडबनवाडी परिसरातील चिंकारा हरिण निरीक्षण केंद्र
शहा येथील विविध बगळ्यांचे सारंगगार
इंदापूर येथील चित्रबलाक पक्षी सारंगगार
नीरा भीमाचा संगम, नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान

सुळे, भरणे, पाटलांचा पुढाकार गरजेचा
राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार सुप्रिया सुळे तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संपूर्ण ताकद पणास लावणे गरजेचे आहे. हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारकडे प्रयत्न करून पडस्थळ, कालठण, पळसदेव, चांडगाव, कांदलगाव येथे जेट्टी उभारणे गरजेचे आहे. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी राष्ट्रीय नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरवल्यास उजनी धरणग्रस्तांचे तसेच इंदापूर तालुक्‍याचे भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Think of Khadakwasla-Ujani Sea Plane