

‘गाळयुक्त शिवार’ला ‘थर्ड पार्टी’ची क्लीन चीट
------
दोन वर्षांतील १५५ कामांच्या पडताळणीत अनियमितता नाही
------
ॲग्रोवन वृत्तसेवा
धाराशिव : जिल्ह्यात मागील दोन आर्थिक वर्षांत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून करण्यात आलेल्या कामांबाबत मोठ्या संख्येने तक्रारी सुरु आहेत. अनेक ठिकाणी ही कामे न करताच रक्कम हडपल्याची चर्चा घडून आली. मात्र, या कामांच्या त्रयस्थ यंत्रणेकडून (थर्ड पार्टी) करण्यात आलेल्या पडताळणीत तसे काहीच आढळून आलेले नाही. एकाही कामात अनियमितता आढळून आली नसल्याचे प्रमाणपत्र त्रयस्थ अधिकाऱ्यांनी दिले आहे. यामुळे या सर्व कामांचे देयक अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जलसंधारणाला चालना देत जलसाठ्यांची क्षमता वाढविणे, धरणे व तलावांतील गाळ काढून त्याचा शेतीसाठी सुपीक माती म्हणून उपयोग करणे आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करून शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी ही योजना राबवण्यात येते. योजनेअंतर्गत जिल्ह्यात २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये मंजूर झालेल्या १५५ कामांसाठी २८ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नालाबांधणीकरण व रुंदीकरणाच्या एकूण १५५ कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये जलसंपदा विभागाची ४५ तर मृद व जलसंधारण विभागाची ११० कामे समाविष्ट आहेत. पूर्ण झालेली कामे ५० अशासकीय संस्था आणि ५ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबविण्यात आली असून,त्यात धरणांतील गाळ काढणे तसेच नालाबांधणीकरण व रुंदीकरणाच्या कामांचा समावेश आहे. यातील काही कामांबाबत तक्रारी आल्याने कामांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करुनच निधी अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले होते. त्यानुसार सर्व १५५ कामांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये कोणत्याही कामात अनियमितता आढळून आली नसल्याचे स्पष्ट झाल्याचे जिल्हा जलसंधार अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी सांगितले.
------
तरीही तीन दिवसाची मुदत
-----
पडताळणी झाली तरी या कामांबाबत शेतकऱ्यांना तक्रार करता येणार आहे. त्यासाठी तीन दिवसाची मुदत देण्यात आली असून शेतकऱ्यांनी काही तक्रार किंवा समस्या असल्यास जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करावी. प्राप्त तक्रारींचे निराकरण केल्यानंतरच संबंधित निधीचे वितरण करण्यात येणार असल्याचे महामुनी यांनी सांगितले.
--------
चौकट
गेल्यावर्षीही ५८ कामांची पडताळणी
गेल्यावर्षीही सन २०२४ - २५ मध्ये पूर्ण करण्यात आलेल्या ५८ कामांची याच पद्धतीने त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतरच कामांसाठी मंजूर निधी वाटप करण्यात आला होता. यात जलसंपदा विभागाची २३ व जलसंधारण विभागाची एकूण ३५ कामांचा समावेश होता. ही कामे २१ अशासकीय संस्था व १ ग्रामपंचायत यांच्यामार्फत पूर्ण करण्यात आली होती. या कामांच्या पडताळणीत कोणतीही अनियमितता आढळून आली नव्हती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.