esakal | तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

sasoon hospital

कोरोना,जंतूसंसर्ग,काविळ,मेंदूज्वर,सायटोकाइंड स्टॉम आणि न्यूमोथोरॅक्‍स अशा वेगवेगळ्या सहा प्राणघातक आजारांशी हे बाळ तब्बल30दिवस झुंजत होतं.ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांनी या बाळाचे प्राण वाचविले.

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार

sakal_logo
By
योगीराज प्रभुणे : सकाळ वृत्तसेवा

पुणे- जन्मानंतर काही तासांमध्येच आक्रमण केलेल्या कोरोनासह सहा वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांना नवजात अर्भकाने अवघ्या 30 दिवसांमध्ये चितपट केले. ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांनी केलेलं अचूक रोगनिदान, प्रभावी उपचार, अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ ही या बाळासाठी जमेची बाजू ठरली. 

ससून रुग्णालयात एका महिलेला प्रसववेदना होत असतानाच गर्भाशयात बाळाला शी झाली. त्यामुळे तातडीने सिझर करून, प्रसूती करण्याचा निर्णय ससून रुग्णालयातील प्रसूततज्ज्ञांनी घेतला. 5 मे रोजी एका गोंडस बाळाचा जन्म झाला खरा, पण ते श्वास घेत नव्हते. त्यामुळे तातडीने त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवावे लागले. नंतर त्याला दोन दिवस व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. प्रसूतीनंतर दुसऱ्या दिवशी आईला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला. त्यामुळे या बाळाचेही कोरोनानिदान चाचणी केली. अवघ्या तिसऱ्या दिवशी या बाळालाही कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बाळाच्या छातीत हवा साचून राहिली. ती बाहेर काढण्यासाठी चार ते पाच दिवस ससून रुग्णालयातील डॉक्‍टरांनी अथक प्रयत्न केले. त्यात यश येताच त्याला जंतूसंसर्ग झाला. त्या पाठोपाठ मेंदूज्वराच्या जंतूंनी या नवजात अर्भकावर हल्ला चढवला. डॉक्‍टरांचे अचूक निदान आणि प्रभावी उपचारांच्या मदतीने त्या बाळाने त्याचा यशस्वी मुकाबला केला. त्याच वेळी जन्मत- होणाऱ्या काविळने डोकं वर काढलं. त्याच्यावर फोटोथेरपी केली. याच दरम्यानच्या काळात त्याच्या शरीरात सायटोकाइंड स्टॉम म्हणजे रोगजंतूबरोबरच शरीरातील रोगप्रतिकार शक्ती असणाऱ्या पेशींचाही नाश होऊ लागला. फुफ्फुस आणि छाती याच्या मधल्या पोकळीत हवा भरू लागली. त्याला वैद्यकीय परिभाषेत न्यूमोथोरॅक्‍स म्हणतात. यामुळे बाळाच्या जिवाला पुन्हा धोका निर्माण झाला. 

कोरोना, जंतूसंसर्ग, काविळ, मेंदूज्वर, सायटोकाइंड स्टॉम आणि न्यूमोथोरॅक्‍स अशा वेगवेगळ्या सहा प्राणघातक आजारांशी हे बाळ तब्बल 30 दिवस झुंजत होतं. ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांनी या बाळाचे प्राण वाचविले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जन्मानंतर 24 दिवस ऑक्‍सिजनवर 
जन्मानंतर सलग 24 दिवस ते बाळ ऑक्‍सिजनवर होते. प्रत्येक दिवशी त्याची प्रकृती वर-खाली होत होती. कधी उपचारांना चांगला प्रतिसाद मिळे. पण, त्यानंतर आणखी दुसरा आजार उफाळून वर येत असे. या सर्व उपचारांदरम्यान बाळाच्या दिव्यांग वडिलांनी रुग्णालयाचा वॉर्ड सोडला नाही. या दरम्यान, रुग्णालयातील मातृ दुग्धपेढीतून दूध देण्यात आले. आता आईकडून स्तनपान सुरू केले आहे, अशी माहिती ससून रुग्णालयाच्या बालरोग विभाग प्रमुख डॉ. आरती किणीकर यांनी दिली. 

कोरोनाबरोबर इतर आजारांनी बाळाला जन्मत-च घेरले होते. श्वसनाच्या त्रासापासून मेंदूज्वरापर्यंत अत्यंत गुंतागुंतीने उद्भवलेले आजार आमच्यासाठी आव्हान होते. डॉक्‍टरांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून बाळाला अनंत अडचणीतून वाचविण्यात आम्हाला यश आले. 
- डॉ. आरती किणीकर, विभाग प्रमुख, बालरोग विभाग, ससून रुग्णालय. 

loading image