३६ तासांच्या बाळाने जिंकली मृत्यूशी लढाई

३६ तासांच्या बाळाने जिंकली मृत्यूशी लढाई

पुणे - अवघ्या ३६ तासांच्या बाळातील रक्तपेशी वेगाने नष्ट होत होत्या. त्याला रक्त देण्यासाठी वडिलांचे तर नाहीच; पण आईचेही रक्त ‘क्रॉसमॅच’ होत नव्हते. त्या बाळातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत होते, तर शरीरात कावीळ पसरत होती. रक्तपेढीतील बऱ्याच बॅगांमधील रक्त ‘क्रॉसमॅच’ केले; पण एकही रक्त त्या बाळाशी जुळत नव्हते. क्षणाक्षणाला बाळाची प्रकृती ढासळत होती. अखेर ‘क्रॉसमॅच’च्या पुढे जाऊन रक्तातील ‘फेनोटाइप’ तपासल्यानंतर रक्तपेशीच्या नाशाचे मूळ सापडले... आणि ३६ तासांच्या बाळाने जिंकली मृत्यूशी लढाई...

ससून रुग्णालयात जन्मलेल्या बाळाला कावीळ झाली. त्या पाठोपाठ हिमोग्लोबिन झपाट्याने कमी होऊ लागले. जन्मल्यापासून ३६ तासांमध्ये पाचपर्यंत हिमोग्लोबिन कमी झाले. त्याला तातडीने रक्ताची गरज होती. त्या बाळाचा रक्तगट ‘ए पॉझिटिव्ह’ तोच रक्तगट आईचाही ! पण, त्याच्याच रक्तगटाचे रक्तही जुळत नव्हते. ससून रुग्णालयाच्या रुग्णाच्या रक्तपेढीतील ‘ए पॉझिटिव्ह’ गटाच्या जवळपास सगळ्या रक्तपिशव्या तपासल्या; पण बाळाचे रक्त ‘मॅच’ होईना. जन्माला येऊन दीड दिवस झालेल्या त्या बाळाचा एक-एक श्‍वास कमी होत होता. अखेर ससून रुग्णालयातील डॉक्‍टरांनी या   बाळाला रक्त मिळण्यासाठी ‘केईएम’ रुग्णालयातील रक्तपेढीत धाव घेतली. रक्तपेढीत फक्त रक्त ‘क्रॉसमॅच’ करून न थांबता त्याची ‘फेनोटाइप’ ही पुढची तपासणी करण्यात आली. त्यातून आई आणि बाळातील फेनोटाइपमध्ये फरक असल्याचे स्पष्ट झाले.

१४ जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. ‘सुरक्षित रक्त सर्वांसाठी’ ही यंदाच्या रक्तदाता दिनाची संकल्पना आहे. त्या निमित्ताने अधिक माहिती देताना ‘केईएम’ रक्तपेढीचे प्रमुख डॉ. आनंद चाफेकर म्हणाले, ‘‘त्या बाळाला वेळीच योग्य रक्ताची नितांत गरज होती. आई आणि बाळाचा रक्तगट सारखाच असूनही रक्त जुळत नव्हते. रक्तपेढीतील इतर बॅगमधील रक्तही जुळण्यात अडथळे आले. त्यामुळे ‘क्रॉसमॅच’चा पुढचा टप्पा असलेले ‘फेनोटाइप’ची तपासणी करण्यात आली. त्यात आई आणि बाळाच्या ‘फेनोटाइप’मध्ये फरक स्पष्टपणे दिसून आला. त्यामुळे आईकडून आलेल्या जनुकांमुळे बाळाच्या रक्तातील रक्तपेशींचा नाश होत होता. त्यातून ही गुंतागुंत निर्माण झाल्याचे निदान झाले. त्याला कारणही असे होते की, पहिल्या प्रसूतीच्या वेळी आईला दिलेल्या रक्तात दोष होता. त्यामुळे शरीरात भरलेल्या रक्ताला विरोध करण्याची यंत्रणा (अँटिबॉडी) आईच्या शरीरात तयार झाल्या होत्या. त्याच अँटिबॉडी बाळाच्या शरीरात आल्या. त्यामुळे जन्मल्यानंतर या अँटिबॉडीमुळे बाळातील रक्तपेशी वेगाने नाश होऊ लागला. यावर उपाय करण्यासाठी बाळाच्या शरीरातील सर्व रक्त काढून त्याला आईप्रमाणे असलेल्या ‘फेनोटाइप’चे रक्त देण्यात आले. त्यानंतर बाळाचे प्राण वाचले.’’

फेनोटाइप म्हणजे काय?
आपल्याकडे ‘एबीओ’ आणि ‘आरएच’ हे दोन प्रमुख रक्तगट आहेत. ‘एबीओ’नुसार रक्तगट ‘ए’, ‘बी’, ‘ओ’ किंवा ‘एबी’ आहे हे समजते. ‘आरएच’नुसार ‘डी’, कॅपिटल आणि स्मॉल ‘सी’, तसेच कॅपिटल आणि स्मॉल ‘इ’ असे पाच अँटिजीन आहेत. सर्वसाधारणतः फक्त ‘डी’ बघितले जाते. ‘डी’ असेल तर ‘पॉझिटिव्ह’ आणि नसेल तर ‘निगेटिव्ह.’ इतर अँटिजिनची तपासणी म्हणजे ‘फेनोटाइप’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com