अकरावीच्या 30 हजार जागा राहणार रिक्त 

ok
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

- पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या सुमारे 30 हजार जागा यंदा रिक्त राहणार 
- विशेषतः विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्यित संस्थांनाच याचा फटका बसणार 
- दरवर्षी वाढणारी अशी महाविद्यालये आणि तुकड्यांच्या वाढत्या संख्येमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे चित्र आहे. 

पुणे : पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या सुमारे 30 हजार जागा यंदा रिक्त राहणार आहेत. विशेषतः विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्यित संस्थांनाच याचा फटका बसणार आहे. दरवर्षी वाढणारी अशी महाविद्यालये आणि तुकड्यांच्या वाढत्या संख्येमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे चित्र आहे. 

अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिली गुणवत्ता यादी बारा जुलै रोजी प्रसिद्ध झाली. त्यासाठी केवळ 63 हजार 566 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये अकरावीची प्रवेश क्षमता एक लाख चार हजार एवढी आहे. प्रवेशाच्या तीन फेऱ्या आतापर्यंत झाल्या आहेत. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे 27 हजारहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. 

तिसऱ्या फेरीत 15 हजार 852 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे; परंतु पुढे एक विशेष फेरी आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य अशा या फेऱ्या असल्याने निम्म्यापेक्षा कमी विद्यार्थी मिळालेल्या महाविद्यालयात यातील विद्यार्थी प्रवेश घेतील. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी आलेल्या एकूण अर्जांपैकी 20 हजार विद्यार्थी शेवटच्या फेरीपर्यंत चांगले महाविद्यालय मिळण्यासाठी प्रयत्न करतील. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या म्हणजेच 63 हजार 566 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तरी उर्वरित 30 हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याचा अंदाज प्रवेशप्रक्रिया समितीतील सदस्यांनी व्यक्त केला आहे. 
असे का झाले? 

पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये शहरांच्या मध्यवर्ती भागातील प्रतिष्ठित अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांसाठी विद्यार्थी प्रवेशासाठी प्राधान्य देतात. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये या महाविद्यालयांतील बहुतांश प्रवेश होतात. त्यानंतर राहतात विनाअनुदानित महाविद्यालये. यातही खासगी क्‍लासबरोबर जोडलेल्या म्हणजे इंटिग्रेटेड महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात. तेथील प्रवेश संख्येच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या कमी असते, त्यामुळे जागा रिक्त राहतात. 

दरवर्षी अशी विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालये आणि तुकड्यांना सरकारकडून मान्यता मिळत राहते. त्यामुळे प्रवेश क्षमता वाढते आणि विद्यार्थी संख्या मर्यादित राहते. या वर्षीदेखील 17 नवीन कनिष्ठ महाविद्यालयांची अकरावी ऑनलाइन प्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे अकरावीच्या तीन हजार 600 जागा वाढल्या आहेत. 

अकरावीची प्रवेशक्षमता : 1,04,139 
प्रवेशासाठी आलेले अर्ज : 63,566 
पहिल्या दोन फेऱ्यांत झालेले प्रवेश : 35,656 

''दरवर्षी कनिष्ठ महाविद्यालये वाढत असल्याने अकरावीच्या जागा वाढत आहेत; परंतु विद्यार्थी संख्या मर्यादित राहात असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे''
- मीनाक्षी राऊत, अध्यक्ष, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirty thousand seats of XI will be vacant