
देहू : पंढरीच्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी वैष्णवांचा मेळा बुधवारी (ता. १८) देहूतील इंद्रायणी नदीकाठी जमला. निमित्त होते आषाढीवारीचे. विठुरायाला भेटण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी देहूतून पंढरपूरकडे तीनच्या सुमारास प्रस्थान ठेवले. हातात भगव्या पताका घेऊन आषाढीवारीसाठी जमलेल्या हजारो वारकऱ्यांनी केलेला टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकाराम नामघोषात देहूनगरी दुमदुमली. प्रस्थान सोहळ्याला पावसाने हजेरी लावली. पावसात आणि भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या वैष्णवांनी आनंदाने पालखीसमोर फेर धरला.