कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत एक वेगळ्याच प्रकारची मॅरेथॉन

मिलिंद संगई
रविवार, 2 ऑगस्ट 2020

मैत्रीदिनानिमित्त परस्परांना शुभेच्छा दिल्या गेल्या, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वेगळ्या पध्दतीच्या मॅरेथॉनचे आयोजन केले गेले. फ्रेंडशिप डे निमित्त बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने "फ्रेंडशिप डे रन" या व्हर्च्यूअल मॅरेथॉनमध्ये आज जगभरातील स्पर्धक सहभागी झाले.

बारामती : मैत्रीदिनानिमित्त परस्परांना शुभेच्छा दिल्या गेल्या, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वेगळ्या पध्दतीच्या मॅरेथॉनचे आयोजन केले गेले. फ्रेंडशिप डे निमित्त बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने "फ्रेंडशिप डे रन" या व्हर्च्यूअल मॅरेथॉनमध्ये आज जगभरातील स्पर्धक सहभागी झाले व या धावण्याचा सरासरी आकडा पोहोचला तब्बल 52 हजार कि.मी. इतका. झिम्बाब्वे, अमेरिका,  दुबई, बांगलादेश, मलेशिया, पाकिस्तान, सिंगापूर,  नायजेरिया, लेबनान या देशांसह एकूण 27 देशातील धावपटू  या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते.

 भारतातून हजारो स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक एका  विधायक हेतूने प्रेरित होऊन धावले. बारामती आणि परिसरातील 1000 स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.

आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिकारशक्ती वाढविणे हे प्रत्येकासमोरचे मोठे आव्हान आहे. या मॅरेथॉनच्या निमित्ताने लोकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करणे, आरोग्याबाबत त्यांना जागृत करणे हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सगळेजण प्रत्यक्षात एकत्र येऊ शकत नसतानाही या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत  भारतीय  आरोग्याबाबत जागरूक आहोत हाच संदेश सर्व सहभागी स्पर्धकांनी दिला. या मॅरेथॉनमध्ये एकूण 5100 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी या मॅरेथॉनचे आयोजन केले. बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी  एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, कार्व्हर एव्हीएशन, अक्षय शिंदे फाऊंडेशन, जोतीचंद भाईचंद सराफ,  मगर ऑर्थोपेडिक इन्स्टिट्यूट, वैष्णवी ग्राफिक्स, अभिषेक पब्लिसिटी, आदित्य मिडिया,  बारामती सायकल क्लब या संस्थांनी विशेष सहकार्य केले. एन्व्हार्यमेंटल हेल्थ क्लब, वुई द फ्युचर ग्रुप, रनर्स ग्रुप या क्रीडा संस्थांनीही मॅरेथॉन दिवशी मोलाचे सहकार्य केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of runners participate in the marathon in Baramati