
घोडेकर यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचे व या गुन्ह्यात एकूण दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांचा समावेश असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
नारायणगाव : येथील जमीन खरेदी विक्री एजंट संग्राम जगन्नाथ घोडेकर यांच्यावरील खूनी हल्ला प्रकरणात नारायणगाव पोलिसांनी अटक केलेला कुविख्यात गुन्हेगार गणेश रामचंद्र नाणेकर याच्यासह तीन आरोपींना जुन्नर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.
"सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार
एजंट घोडेकर यांच्यावर सात जानेवारी रोजी दुपारी नारायणगाव येथे कोयत्याने खूनी हल्ला झाला होता. स्थावर मालमत्ता व आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे (वय ६२, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) याने नाणेकरवाडी येथील कुविख्यात गुन्हेगार गणेश रामचंद्र नाणेकर (वय २५, ता. खेड) याला घोडेकर यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचे व या गुन्ह्यात एकूण दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांचा समावेश असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी सोमवारी (ता. ११) गणेश नाणेकर, अजय उर्फ सोन्या किरण राठोड (वय २३), संदिप बाळशिराम पवार (वय २०) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. नाणेकर, राठोड व पवार यांना जुन्नर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना १६ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अल्पवयीन आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आरोपींनी हल्ला करण्यासाठी वापरलेला कोयता, दुचाकी, मोटार व फरार आरोपी प्रशांत माने (वय ,३५) याचा तपास सुरू आहे.या गुन्ह्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अजून कोणाचा सहभाग आहे का याची सुद्धा चौकशी सुरू असल्याची माहिती गुंड यांनी दिली.
(संपादन : सागर डी. शेलार)