पुणे - स्वत:ला राजकीय पक्षाचा अध्यक्ष आणि पत्रकार असल्याचे सांगून आयुर्वेदिक उपचार केंद्रातील महिलेकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. धनकवडीतील पुण्याईनगरमधील क्लासिक हाईट॒समधील आयुर्वेदिक उपचार केंद्रात हा प्रकार घडला. या प्रकरणी न्यायालयाने तिघा आरोपींना १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
रोहित गुरुदत्त वाघमारे (वय २९, रा. भीमनगर, उत्तमनगर), शुभम चांगदेव धनवटे (वय-२०, रा. गणराज कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) आणि राहुल ज्ञानेश्वर वाघमारे (वय ३६, रा. केळेवाडी, पौड रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाघमारे हा तीन फेब्रुवारी रोजी आयुर्वेदिक उपचार केंद्रात गेला. त्यावेळी त्याने ‘मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. मी सांगेन तसे उपचार न केल्यास आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेन,’ अशी धमकी देऊन उपचार करून घेतले.
त्यानंतर वाघमारे इतर दोघांना घेऊन आला. त्यांनी महिलेकडे २० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास समाज माध्यमावर व्हिडिओ चित्रफीत प्रसारित करू, अशी धमकी दिली. तसेच, काऊंटरमधील आठशे रुपये काढून घेतले.
याबाबत सहकारनगर पोलिसांनी सहा मार्च रोजी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा ठावठिकाणा शोधून वारजे माळवाडी पोलिसांच्या मदतीने तिघांना अटक केली. अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलिस अंमलदार अमोल पवार, बजरंग पवार, महेश मंडलिक, सागर सुतकर, किरण कांबळे आदींनी ही कारवाई केली.
व्हिडिओ रेकॉर्डिंग करून खंडणीची मागणी -
आरोपींपैकी एकजण पहिल्यांदा ग्राहक म्हणून मसाज सेंटरमध्ये जात असे. शर्टच्या वरच्या खिशात मोबाईल ठेवून व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची. त्यानंतर इतर साथीदारांना बोलावून ती चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी देवून खंडणी उकळत असत.
दोघा आरोपींवर यापूर्वी वारजे, बीड जिल्ह्यातील अंभोरा आणि आहिल्यनगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी शहरात सात-आठ ठिकाणी असे गुन्हे केल्याचे चौकशीत समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.