
एकविरा देवी यात्राकाळात तीन दिवस ‘ड्राय डे’
लोणावळा - कोळी, आगरी समाजासह असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला येथील श्री एकवीरा देवीच्या (Ekvira Devi) चैत्री यात्रेदरम्यान (Yatra) कायदा (Law) व व्यवस्था राखण्यासाठी यात्रेच्या मुख्य तीन दिवशी परिसरात दारुबंदी व गडावर पशुहत्या करण्यास बंदी (Ban) करण्यात आली आहे.
श्री. एकविरा देवी हे जागृत देवस्थान असून देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. लोणावळ्याजवळील कार्ला येथील एकवीरा देवीची चैत्री यात्रा गुरुवारी चैत्र शु. षष्ठी ते अष्टमी (ता.०७ ते ०९ एप्रिल) काळात होत आहे. यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी राज्यातून तसेच मुंबई, ठाणे, पेण, पनवेल, उरण, कर्जत, खोपोली, रायगड, अलिबाग या भागातील आगरी, व कोळी समाजाचे लोक हे प्रामुख्याने मोठया संख्येने येत असतात. तसेच मावळ तालुका व पुणे जिल्हयातूनही दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. हजारो पालख्या व दिंड्या परंपरेनुसार कोकणातून कार्ल्याला पायी येतात. देवीच्या पालखी सोहळ्यास लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांच्या खंडानंतर गडावर देवीची यात्रा होत असल्याने यंदा मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यात्राकाळात मोठ्या प्रमाणात दारुचे सेवन होते त्यातून भांडण, तंटा, वाद होत असतो. तसेच गडावर भाविक ढोल, ताशे, स्पीकर व इतर वादये, फटाके घेवून तसेच ग्रुपने एकाच प्रकारचे टी शर्ट घालून एकत्र येत असतात. त्यामुळे वाद निर्माण होतात. यात्राकाळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कलम १४४ लागू करण्यात आले असून कडक निर्बंधात यात्रा संपन्न होणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता येण्यासाठी गडावर आणि गड परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गडावर दारुबंदी तसेच पशुहत्येवर बंदी करण्यात आली आहे. यात्रा काळात वेहेरगाव, कार्ला, मळवली, वाकसई, वरसोली, देवघर आदी परिसरात दारुविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक भाविकांच्या वाहनाची कसून तपासणी करण्यात येणार असल्याचे लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांनी सांगितले.
यात्राकाळात घालण्यात आलेले निर्बंध
१) एकविरादेवी यात्रेचे कालावधीत शोभेची दारु, फटाके गडावर नेणे, गडावर फटाके फोडणे,
२) एकाच प्रकारची व रंगाची कपडे / वेशभूषा करून गोंधळ घालणे, शिवीगाळ करणे, अर्वाच्च भाषेत बोलणे, एकमेकांत अथवा ग्रुपमध्ये भांडणे करणे.
३) एकविरादेवी यात्रेचे कालावधीत कोंबडे, बकरे, पशु, पक्षी यांचा बळी देणे व मंदिरावर सोडणे.
४) कार्ला लेणी व परिसरातील ऐतिहासिक वास्तु व शिल्पांना हानी पोहचविणे किंवा विद्रुपीकरण करणे.
Web Title: Three Days Dry Day During Ekvira Devi Yatra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..