कर्णबधिरांना तीन मूकनायकांमुळे न्याय 

कर्णबधिरांना तीन मूकनायकांमुळे न्याय 

पुणे - ऐकू येत नसलेल्या आणि बोलताही येत नसलेल्या युवकांना हजारोंच्या संख्येने संघटित केले जालना, परभणी आणि मुंबईतील तीन मूकनायकांनी. त्यासाठी सलग दोन-तीन महिने त्यांनी सांकेतिक भाषेतून संवाद साधत कर्णबधिरांचे ‘नेटवर्क’ भक्कम केले. अहोरात्र परिश्रम घेतल्यामुळे त्यांच्या कष्टांना यश आले अन्‌ दोन हजारांपेक्षा जास्त कर्णबधिर युवक राज्याच्या कानाकोपऱ्यांतून पदरमोड करून आंदोलनासाठी पुण्यात पोचले. 

जालन्याचे मनोज पटवारी, परभणीचा अनिकेत शेलगावकर आणि मुंबईचा प्रदीप मोरे यांनी या आंदोलनाचे प्रतिनिधित्व केले. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने कर्णबधिर युवकांना त्यांनी एकत्रित केले. त्यासाठी प्रयत्न चार वर्षांपासून सुरू होते. तर, पुण्यातील आंदोलनासाठी त्यांनी गेले तीन महिने कष्ट घेतले. त्यामुळेच आंदोलनाला यश आले अन्‌ त्यांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारला मंजूर कराव्या लागल्या. कर्णबधिर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्यामुळे सरकारच्याही पोटात गोळा आला होता. कर्णबधिर युवकांचे संघटन कसे केले, याबद्दल अनिकेत म्हणाला, ‘‘आंदोलनासाठी संघटन महत्त्वाचे होते. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून एक-एक माणूस शोधणे, त्या भागातील कर्णबधिरांच्या संघटनांना भेटणे, त्यांना तयार करणे यासाठी खूप मेहनत घेतली. आज प्रत्येक जिल्ह्यात आमची संघटना आहे. राज्यभरातून २८ नोंदणीकृत संघटना आम्हाला जोडले गेल्या आहेत.’’ संघटन, आंदोलन यासाठी आम्ही पदरमोडच केली. त्यामुळे आर्थिक ताण आला, पण हक्कांसाठी त्याची पर्वा केली नाही, असे सांकेतिक भाषेच्या तज्ज्ञांच्या मदतीने अनिकेतने सांगितले.  प्रदीप हा गेल्या दहा वर्षांपासून कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करतो. त्यामुळे त्याच्या माध्यमातून ‘नेटवर्किंग’ लवकर झाले, तर मनोज यांनी शासकीय पत्र-व्यवहार, अर्ज करणे ही बाजू सांभाळली. 

त्या ‘तिघीं’शिवाय हे शक्‍य नव्हते ! 
कर्णबधिरांसाठी धोरण तयार करणारे आणि अंमलबजावणी करणाऱ्यांना कर्णबधिरांशी कधी संवादच साधता आला नाही. त्यामुळेच प्रत्येक वेळी सांकेतिक भाषा तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. समाज कल्याण खात्यातील एकही अधिकारी संवाद साधू शकत नसल्यामुळे तस्लिम शेख, अतिया हाजी, श्रुती आवळे या सांकेतिक भाषा तज्ज्ञ युवतींची मदत त्यांना घ्यावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिलीप कांबळे, अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, रमेश बागवे, लक्ष्मण माने यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी, समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांशी या तिघींनीच संवाद साधला. त्यामुळेच आंदोलन यशाच्या टप्प्यात पोचले, असे अनिकेतने सांगितले. 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com