तीन महिन्यांत 11 कोटी रुपये रेल्वेच्या पुणे विभागाच्या तिजोरीत जमा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजीपाला पुण्यातून रेल्वेने दिल्ली, पाटणा, कोलकता येथे; चिंचवडमध्ये तयार होणारी वाहने बांगलादेश, आगरताळा, आसाम येथे, तर कऱ्हाड-बारामतीची साखर गुवाहटीपर्यंत पोचू लागली आहे. 

पुणे- कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर मर्यादा आल्याने रेल्वेने मालवाहतुकीवर भर दिला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत रेल्वे पोचत असून, या मालवाहतुकीतून ती मालामाल होत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजीपाला पुण्यातून रेल्वेने दिल्ली, पाटणा, कोलकता येथे; चिंचवडमध्ये तयार होणारी वाहने बांगलादेश, आगरताळा, आसाम येथे, तर कऱ्हाड-बारामतीची साखर गुवाहटीपर्यंत पोचू लागली आहे. 

रेल्वेने तयार केलेल्या "बिझिनेस प्लॅन'मध्ये पुणे आणि परिसरातील उत्पादक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. रेल्वेने पुण्यात जुलैमध्ये बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट स्थापन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत गेल्या तीन महिन्यांत 11 कोटी रुपये रेल्वेच्या पुणे विभागाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. वाहन उत्पादन, भाजीपाला, फळे, धान्य यांच्या वाहतुकीवर भर देताना पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी आणि शेतकऱ्यांशीही रेल्वेने संपर्क वाढविला आहे. रस्ते वाहतुकीपेक्षा 40 टक्के कमी दरात रेल्वेची वाहतूक होते. त्यामुळे रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. महिंद्रा कंपनीने त्यांची चार चाकी वाहने रेल्वेने बांगलादेश आणि पूर्वेकडील राज्यांत पोचविली आहेत. टाटा मोटर्सनेही रेल्वेचा वापर सुरू केला आहे. पियाजिओ, व्होक्‍सवॅगन या कंपन्याही रेल्वेच्या संपर्कात आहेत. तसेच पश्‍चिम महाराष्ट्र, सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांची साखर मुंबई, दिल्ली आणि पूर्वेकडील राज्यांत पोचत आहे, अशी माहिती रेल्वेचे विभागीय वरिष्ठ व्यवस्थापक (परिवहन) डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महिंद्र लॉजिस्टिकच्या नीता शिर्के म्हणाल्या, ""रेल्वे स्टेशनवर जाऊन पार्सल विभागात चौकशी करा, बुकिंग करा, ही सगळी प्रक्रिया आता बदलली आहे. मोबाईल फोनवरून रेल्वे गाडी आरक्षित करता येते. त्याचा पत्रव्यवहार ऍपवरून होऊ लागला आहे. त्यामुळे महिंद्राची प्रिमियम सेक्‍शनमधील वाहनेही आता रेल्वेने आम्ही पाठवत आहेत. अलीकडील काळात रेल्वेने खूप बदल केला आहे. त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माल वाहतुकीसाठी रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे स्वस्त आणि सुरक्षित आहे. अगदी 50 किलोपासून माल ते उचलत असल्यामुळे व्यावसायिक, उद्योजकांसाठी ते सोयीचे ठरत आहे. लघु आणि मध्यम उद्योजकांपर्यंत रेल्वेकडून संपर्क साधला जात आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. 
-प्रदीप सिन्नरकर, लघुउद्योजक 

लघुउद्योजकांना वाढती संधी 
मालवाहतुकीमध्ये रेल्वे पहिल्यापासूनच आहे. परंतु, आता प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत करण्यात आली आहे. अधिकाधिक उद्योगांनी रेल्वेचा मालवाहतुकीसाठी वापर करावा, यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरसारख्या संघटनांशी रेल्वेने संपर्क साधला आहे. तसेच लघू आणि मध्यम उद्योगांच्या मालवाहतुकीसाठी अनेक पॅकेज उपलब्ध करण्यात आले आहेत. 

असा आहे बिझिनेस प्लॅन 
210 - सहभागी कंपन्या 
1100 कोटी  - तीन महिन्यांतील कमाई 
10 किलो - किमान वजन मर्यादा 
60 टक्के  - रस्ते वाहतुकीच्या तुलनेत बचत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three months Rs 11 crore was deposited in the treasury of Pune division of Railways