esakal | बारामतीकरांनो सावधान, आता तुमच्यासमोर आहे हा मोठा धोका...  
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

बारामतीत काल एकाच दिवशी 18 कोरोनाग्रस्त सापडले. त्यामुळे बारामतीकरांचे धाबे दणाणले होते. बारामतीच्या व्यवहारांवर त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत निर्बंध आणण्यात आले आहेत.

बारामतीकरांनो सावधान, आता तुमच्यासमोर आहे हा मोठा धोका...  

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरात आज कोरोनाचे पुन्हा तीन रुग्ण सापडले. त्यामुळे आता बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 60 वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान, अजूनही 46 जणांचे अहवाल येणे बाकी असल्याने पुन्हा एकदा बारामती गॅसवर आहे. बारामतीतील रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून, समूह संसर्गाचा धोका उभा राहिला असावा, अशी शक्यता आता वर्तविली जात आहे. दुपारी तीननंतर व्यवहार बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, दुपारी तीननंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्यांसह मास्कविना फिरणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. 

आणखी वाचा - पुण्याची सूत्रं हाती घेताच नव्या आयुक्तांनी काय केलं?

बारामतीत काल एकाच दिवशी 18 कोरोनाग्रस्त सापडले. त्यामुळे बारामतीकरांचे धाबे दणाणले होते. बारामतीच्या व्यवहारांवर त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत निर्बंध आणण्यात आले आहेत. या 18 रुग्णांच्या संपर्कातील 68 जणांच्या घशातील द्रावाचे नमुने काल घेण्यात आले होते. त्यापैकी 22 जणांचे अहवाल दुपारी साडेबारापर्यंत प्राप्त झाले होते. यात तीन रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले. उर्वरित 19 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, शहरातील ज्येष्ठ नगरसेवकाच्या चिरंजीवाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, शहरातील काही खासगी व व्हेंटिलेटर्सची सुविधा असलेली रुग्णालये ताब्यात घेण्याच्या दृष्टीनेही प्रशासनाने तयारी केली आहे. रुग्ण संख्या वाढल्यास त्यांची सोय कोणत्या दवाखान्यात करायची व कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांवर कोठे अंत्यसंस्कार करायचे, याचेही नियोजन सुरू झाले आहे. शहरात 18 रुग्ण एकाच दिवशी मिळाल्यानंतरही आज लोकांना याचे फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. बँकासह अनेक ठिकाणी आज मोठी गर्दी पाहायला मिळाली. 
 
Edited by : Nilesh Shende