पुणे : बालभारती ते पौड रस्त्यासाठी तीन पर्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balbharati to paud road traffic

बालभारती ते पौड रस्त्याच्या डीपीआरचे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, यामध्ये हा रस्ता तीन प्रकारे करण्याचे पर्याय देण्यात आले आहेत.

पुणे : बालभारती ते पौड रस्त्यासाठी तीन पर्याय

पुणे - बालभारती ते पौड रस्त्याच्या डीपीआरचे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, यामध्ये हा रस्ता तीन प्रकारे करण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये १.८ किलोमीटरचा थेट बोगदा करणे, उन्नत मार्ग (इलोव्हेटेड) किंवा थेट डोंगरातून रस्ता करणे या तीन पर्यायांचा समावेश आहे. या तीन पैकी एक मार्ग चर्चा करून निश्‍चीत केला जाणार आहे.

कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता या परिसरातील नागरिकांना सेनापती बापट रस्त्याला जायचे असेल तरी त्यांना सध्या एकमेव विधी महाविद्यालय रस्‍त्याचा पर्याय आहे. तसेच सेनापती बापट रस्त्यावरून कोथरूड किंवा शहराच्या इतर भागात जाताना नळ स्टॉप चौकात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने विकास आराखड्यात दर्शविलेल्या बालभारती ते पौड रस्ता हा विधी महाविद्यालयाच्या पाठीमागील टेकडीवरून नवा रस्ता प्रस्तावित केला आहे. हा रस्ता केल्याने मोठ्याप्रमाणात वृक्षतोड होणार असल्याने त्यास या परिसरातील नागरिक, पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शविलेला आहे. पण भविष्यातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे.

या रस्त्याचे काम करण्याचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला होता, या सल्लागाराचे काम पूर्ण झाले असून. त्याचा अहवाल येत्या आठवड्याभरात सादर केला जाणार आहे. दरम्यान या बालभारती ते पौड रस्ता हा रस्ता तीन प्रकारे केला जाऊ शकतो, पण पर्यावरणाचे रक्षण व खर्चाचा विचार करून यातील एक पर्याय निश्‍चीत केला जाणार आहेत.

पर्याय एक - थेट डोंगरातून रस्ता

बालभारती ते पौड रस्ता करताना तो थेट जसा डोंगर आहे तसा रस्ता केला जाईल. त्यामुळे चढ, उतार याचा समावेश असेल. आवश्‍यक तेथे नाले किंवा डोंगरावरील पाण्याचा प्रवाह वाहून जाण्यासाठी छोटे पूल असतील. पण यामुळे या टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी अडथळा होऊ शकतो. या रस्त्यासाठी ८५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.

पर्याय दोन - उन्नत मार्ग

हा १.८ किलोमीटरचा रस्ता मेट्रोप्रमाणे उन्नत मार्ग करावा. साधारणपणे तीन मीटरचे पिलर उभारून त्यावरून हा रस्ता केला जाईल. त्यामुळे फिरायला येणाऱ्या नागरिकांना अडथळा होणार नाही. या मार्गासाठी १७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.

पर्याय तीन - बोगदा

बालभारती ते पौड रस्ता या दरम्यान टेकडीच्या खालून बोगद्याचा पर्याय सल्लागाराने दिला असून, त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. पण बोगदा केल्याने पाण्याचे झरे खंडित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शहरातील कोणत्याही टेकडीच्या खालून बोगदा करण्यास पर्यावरण प्रेमींनी विरोध केलेला आहे. खर्चाचा विचार करता महापालिका या पर्यायाचा विचार करण्याची शक्यता कमी आहे.

१४०० झाडे तोडावी लागणार

पर्याय एक किंवा पर्याय दोन निवडला या टेकडीवरील १ हजार ४०० झाडे तोडावे लागणार आहेत. त्याबदल्यात शासनाच्या नियमानुसार वृक्षारोपण केले जाईल.

‘बालभारती ते पौड रस्ता याचा डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रस्त्यासाठी तीन पर्याय सुचविले आहेत. याबाबत चर्चा करून योग्य पर्याय निवडला जाईल.’

- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग

Web Title: Three Options For Balbharati To Paud Road

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..