पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात तीन जण ठार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 October 2019

- टायर फुटल्याने मोटारीची लेन ओलांडून दुचाकीला धडक

कुरकुंभ : मळद (ता. दौंड) येथील पवारवस्तीजवळ पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाने पुण्याकडे भरधाव जाणाऱ्या इर्तिका मोटार अचानक टायर फुटल्याने दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुचाकीला धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोन व मोटारीतील एक, असे तीन जण जागीच ठार झाले; तर दोन जण गंभीर जखमी असून, एक जण किरकोळ जखमी आहे. हा अपघात आज (ता. 31) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला.

पुणे- सोलापूर महामार्गावरून सोलापूरकडे भरधाव जाणाऱ्या इर्तिका मोटारीचा (क्र. एमएच 12 एनपी 0613) अचानक टायर फुटला. त्यामुळे मोटार दुभाजक ओलांडून विरुद्ध लेनवरून पुण्याकडे जाणाऱ्या दुचाकीला (नवीन गाडी असून, क्रमांक नाही) जोरात धडकली. या अपघातात दुचाकीवरील महंमद हुसेन शेख, दादा अप्पा शिंदे (वय 40, दोघे रा. मानेवाडी शिंपोरा, ता. कर्जत, जि. नगर) व मोटारीतील जगदीश गिरिराज अग्रवाल (वय 68, रा. काश्‍मिरी कॉलनी, येरवडा, पुणे) हे तीन जण गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. संतोष जयप्रकाश अग्रवाल (वय 62), पुष्पलता जगदीश अग्रवाल (वय 65, दोघे रा. काश्‍मिरी कॉलनी, येरवडा) हे दोन जण गंभीर जखमी झाले.

जखमींना उपचारासाठी भिगवण (ता. इंदापूर) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडीचालक किरकोळ जखमी झाला असून, त्याचे नाव समजू शकले नाही. यासंदर्भात स्वप्नील रावसाहेब शिंदे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अपघातस्थळी दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी भेट दिली. अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली के. बी. शिंदे, पंडित मांजरे, राकेश फाळके करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three person dead in accident on Pune Solapur highway