पूर्ववैमनस्यातून एकाचा खून केल्याप्रकरणी तिघांना अटक

प्रफुल्ल भंडारी
शुक्रवार, 4 मे 2018

सुजित टाक व त्याचे साथीदारांनी विनोद याचे दोन्ही हात व पाय दगडाने चेचण्यासह तलवारीने वार करून गंभीररित्या जखमी केले. तर काही माहिलांनी मीना नरवाल हिला मारहाण केली. सदर भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या काही शेजाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली.

दौंड (पुणे) : लिंगाळी (ता. दौंड) येथे पूर्ववैमनस्यातून विनोद बाबूलाल नरवाल (वय 42) या व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी तीन महिलांसह एकूण 20 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी त्यापैकी तिघांना अटक केली आहे. उर्वरित १७ आरोपी फरार असून, त्यामध्ये रेल्वे कर्मचारी, वकील आदींचा समावेश आहे. विनोद नरवाल यास मागील महिन्यात पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दहा दिवसांसाठी दौंड तालुक्यातून हद्दपार केले होते.                    
दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी आज (ता. ४) या बाबत माहिती दिली. दौंड शहराजवळील लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील पासलकर वस्ती येथे गुरूवारी (ता. ३) रात्री हा प्रकार घडला. दौंड न्यायालय इमारतीपासून वळसा घेत संजित टाक याच्या घरोसमोरून विनोद नरवाल हा त्याची पत्नी मीना यांच्यासह दुचाकीवरून जात असताना टाक बंधूंनी पूर्ववैमनस्यातून दोघांना अडवून मारहाण करण्यास सुरवात केली.

सुजित टाक व त्याचे साथीदारांनी विनोद याचे दोन्ही हात व पाय दगडाने चेचण्यासह तलवारीने वार करून गंभीररित्या जखमी केले. तर काही माहिलांनी मीना नरवाल हिला मारहाण केली. सदर भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या काही शेजाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. दरम्यान टाक बंधू व त्यांचे साथीदार निघून गेल्यानंतर जखमी विनोद याला मध्यरात्री दौंड शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले व पुणे येथे पुढील उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय पथकाने आज (ता. ४) सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या खूनप्रकरणी मीना विनोद नरवाल (रा. पासलकर वस्ती, लिंगाळी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार संजित जयप्रकाश टाक, सुजित जयप्रकाश टाक, रवी जयप्रकाश टाक, रणजित जयप्रकाश टाक, आकाश उर्फ छोटू बहोत, आशिष बहोत, नरेश वाल्मिकी, बबलू सारवान, सुरेश सारवान, उषा घंटे, मयुरी संजित टाक, माधुरी सुजित टाक, शोभा किशोर वाल्मिकी, विकी नरेश वाल्मिकी, सौरभ वाल्मिकी आणि इतर पाच जणांविरूध्द खून करणे, दंगल करणे, शस्त्रांचा वापर करणे, आदी प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. 
 

सदर खूनप्रकरणी संजित जयप्रकाश टाक (वय ३८), रवी जयप्रकाश टाक (वय २७, दोघे रा. पासलकर वस्ती, लिंगाळी) व आकाश दीपक बहोत (वय २८, रा. वाल्मिकीनगर, रेल्वे वसाहत, दौंड) या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन तलवारी जप्त केल्या आहेत.  
 

विनोद नरवाल हा दौंड रेल्वे स्थानकाच्या साफसफाईचे काम कंत्राटी पध्दतीने करीत होता. त्याच्याकडील युवक रेल्वे प्रशासनाच्या संगनमताने दौंड - पुणे, दौंड - सोलापूर, दौंड - नगर दरम्यान धावत्या गाड्यांमध्ये अनधिकृतपणे भेळ व अन्य खाद्यपदार्थांची विक्री करीत होते. सुजित व रवी टाक यांनादेखील मागील महिन्यात पोलिसांनी दहा दिवसांसाठी दौंड तालुक्यातून हद्दपार केले होते.

उप अधीक्षक गणेश मोरे व निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून गुन्ह्याच्या ठिकाणी व परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. 

संशयित आरोपी सी. आर. संघटनेचा शहराध्यक्ष

कुख्यात गुंड छोटा राजन (सी. आर.) याचा मामेभाऊ आणि सी. आर. संघटनेचे संस्थापक अॅड. हेमचंद्र मोरे यांच्या सी. आर. सामाजिक संघटनेचा सुजित टाक हा दौंड शहराध्यक्ष होता. मार्च २०१८ मध्ये सुजित टाक याची या पदावर निवड करण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three youths arrested for killing one