घुंगरांच्या बोलांना हवी मदतीची साथ 

युनूस तांबोळी
Thursday, 23 April 2020

कोरोनामुळे यात्रा- जत्रांमधील मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द झाल्यामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ 

टाकळी हाजी : लॉकडाउनमुळे असलेला कडकडीत बंद व यात्रा- जत्रांमधील मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द झाल्यामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना व फडमालकांना राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेऊन मदत करणे गरजेचे असल्याची भावना कलावंतांकडून व्यक्त होत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा, जत्रा, उरुस व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. पाडव्याला येणाऱ्या तमाशा कार्यक्रमाच्या सुपाऱ्या देखील लॉकडाउनमुळे रद्द झाल्या आहेत. लोकनाट्य तमाशा, भारूड, जागरण गोंधळ या कार्यक्रमांवर बंदी आली. चार महिने मनोरंजन करून मिळणाऱ्या बिदागीत वर्षभर प्रपंचाचा गाडा चालविण्याचे काम ही कलाकार मंडळी करत असतात. मात्र, कोरोनामुळे संचारबंदीत या कलाकारांना घरीच थांबा व सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला. 

रंगमंचाच्या या कलाकारांना ऐन हंगामात बिदागीऐवजी घरात थांबण्याची वेळ आली आहे. यात्रा जत्रांच्या हंगामाच्या सुरवातीला ओढवला गेलेला हा प्रसंग या कलाकाराच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे हे कलाकार राजाश्रय मिळण्याची अपेक्षा करून आहेत. सध्या तरी या गरीब कलावंतांना खासदार, आमदार व सामाजिक संस्थानी पुढाकार घेऊन प्रापंचिक साहित्य देऊन उपासमारी टाळावी, अशी अपेक्षा आहे. शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड या परिसरात मोठ्या प्रमाणात लोककलावंत आहेत. त्यांची यादी तयार करून त्यांना जीवनावश्‍यक सेवा पुरविण्याची मागणी सध्या तमाशा लोककलावंत करू लागले आहेत. 

वर्षानुवर्षे लोककलावंत मनोरंजनातून प्रबोधन करत आहेत. त्यांच्या जिवंत कलेतून सामाजिक वास्तवाचे भान समाजाला दिले जाते. अशा लोककलावंताच्या व्यथा समाजासमोर मांडल्या जाव्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोककलावंताची उपासमारी होणार नाही, याकडे लक्ष वेधले जाऊन त्यांना मदत व्हावी. 
- सीमा पोटे, लोककलावंत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A time of famine on folk artists due to corona