सायकलवरून तिरुपती-बारामती अवघ्या 55 तासांत

मिलिंद संगई
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तिरुपती बालाजी ते बारामती असे तब्बल 1100 किलोमीटरचे अंतर अवघ्या 55 तासांत पूर्ण करून बारामतीचे आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.

बारामती (पुणे) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तिरुपती बालाजी ते बारामती असे तब्बल 1100 किलोमीटरचे अंतर अवघ्या 55 तासांत पूर्ण करून बारामतीचे आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.

बारामती हायटेक टेक्‍स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी ननवरे यांचे बारामतीतील भिगवण चौकात स्वागत केले. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, प्रशांत नाना सातव, ऍड. श्रीनिवास वायकर, राहुल जगताप, ऍड. अमर महाडिक उपस्थित होते.

आरोग्य सुदृढ राहावे, सायकलचा वापर दैनंदिन जीवनात अधिकाधिक व्हावा या उद्देशाने निरोगी जीवनासाठी सायकलचा वापर वाढविण्याचा संदेश देण्यासाठी सतीश ननवरे यांनी हा टप्पा पार केला. शरद पवार यांना दीर्घायू लाभावे, या उद्देशाने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सायकलचा संदेश समाजात रूढ व्हावा, यासाठी हा उपक्रम राबवल्याचे ननवरे यांनी सांगितले. 10 डिसेंबर रोजी पहाटे तिरुपतीहून ते सायकलने निघाले. दोन दिवसांत 1100 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत ते बारामतीत पोचल्यानंतर बारामतीकरांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

सतीश ननवरे यांनी यापूर्वी ऑस्ट्रियातील क्‍लॅनफर्ट येथे स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे; तसेच ऑस्ट्रेलियातील बसलटन येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत यश मिळविले आहे. पुणे-बारामती, कोल्हापूर-बारामती, अष्टविनायक दर्शन हेही त्यांनी सायकलवरून पूर्ण केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tirupati To Baramati Distance Cross In 55 Hours On Cycle