तंबाखूचे सेवन, चुलीवरील स्वयंपाकामुळे COPD चा धोका वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंबाखूचे सेवन, चुलीवरील स्वयंपाकामुळे COPD चा धोका वाढला
तंबाखूचे सेवन, चुलीवरील स्वयंपाकामुळे COPD चा धोका वाढला

तंबाखूचे सेवन, चुलीवरील स्वयंपाकामुळे COPD चा धोका वाढला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोणत्याही प्रकारच्या तंबाखूचे सेवन तुम्ही करत असाल, तुमच्या घरात अद्यापही चुलीवर स्वयंपाक होत असेल, तसेच कामानिमित्त तुमचे शहरातील रस्त्यांवर खूप फिरणे होत असेल, तर तुम्ही रोजच्या रोज ‘सीओपीडी’या घातक आजाराला निमंत्रण देत आहात हे निश्चित. ‘सीओपीडी’ (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) या आजाराच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी १७ नोव्हेंबर हा जागतिक सीओपीडी दिन म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांनी ही माहिती दिली.

छातीच्या ‘ओपीडी’त येणाऱ्या प्रत्येक सहाव्या रुग्णाला ‘सीओपीडी’ आजार असल्याचा निष्कर्ष अभ्यासातून निघाला आहे. या संदर्भातील दीर्घकालीन फुफ्फुसाच्या आजारांच्या क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणासाठी कार्यरत संस्था पुण्यातील स्क्रेस्ट या संस्थेतर्फे ४४ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आठवडाभर ‘स्क्रीन’ हा उपक्रम राबविण्यात आला. त्याबद्दल ‘स्क्रेस्ट’चे संचालक डॉ. संदीप साळवी म्हणाले, ‘‘या आजाराच्या तपासणीचा हा पहिला देशव्यापी उपक्रम आहे. वैद्यकीय महविद्यालयांमधील छातीच्या बाह्यरोग विभागात (ओपीडी) येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची तपासणी यातून करण्यात आली. त्यातून सहाव्या रुग्णाला ‘सीओपीडी’ असल्याचे लक्षात आले.’’

असा केला अभ्यास

‘स्क्रीन’ उपक्रमांतर्गत वैद्यकीय महाविद्यालयांमधून दोन हजार ४४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात रुग्णांकडून आठ प्रश्नांची उत्तरे घेण्यात आली. ज्यांची तपासणी ‘पॉझिटिव्ह’ आली त्यांची ‘स्पायरोमेट्री’ चाचणी घेण्यात आली. त्यात ७५ टक्के पुरुष आणि २५ टक्के महिला होत्या. त्यापैकी २६९ (११ टक्के) रुग्णांना ‘सीओपीडी’चे निदान झाले.

अहवाल काय सांगतो?

२०१९ च्या अहवालानुसार, भारतात तंबाखूच्या धूम्रपानामुळे होणारे ‘सीओपीडी’चे प्रमाण २९ टक्के आहे. तर, हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या ‘सीओपीडी’चे प्रमाण ५३.३ टक्के आहे.

देशात यामुळे होतात दररोज रुग्णांचे मृत्यू

 • सीओपीडी - २४००

 • क्षयरोग - ११५७

 • मधुमेह - ७४८

 • एचआयव्ही-एड्स - १२६

‘सीओपीडी’ची कारणे

कोणत्याही स्वरूपात

 • तंबाखूचे सेवन

 • स्वयंपाकासाठी सरपणाचा वापर

 • हवाप्रदूषण

 • डासांची कॉइल जाळणे

 • वाहनांमधून

 • बाहेर पडणारा धूर

 • औद्योगिक धूर

 • रस्त्यावरील धूळ आणि धुळीच्या ठिकाणची कामे

loading image
go to top