बारामतीत आज सायकल रॅली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

बारामती -  सरकारने प्लॅस्टिकबंदी केलेली असली तरी नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे त्याचे पालन व्हावे व या बाबत प्रबोधन करण्याच्या उद्देशाने सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सोमवारी (ता. २८) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

बारामती -  सरकारने प्लॅस्टिकबंदी केलेली असली तरी नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे त्याचे पालन व्हावे व या बाबत प्रबोधन करण्याच्या उद्देशाने सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सोमवारी (ता. २८) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात होणार आहे.  विविध संस्था व संघटना, प्रशासकीय अधिकारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सायकल रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय सकाळच्या वतीने घेतला गेला. बारामती नगरपालिकेसह बारामती सायकल क्‍लब,  बारामती शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना, रोटरी क्‍लब ऑफ बारामती यांच्यासह अनेक स्वयंसेवी संस्था व संघटना या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. संध्याकाळी पाचला नगरपालिकेच्या प्रवेशद्वारापासून ही रॅली निघणार आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला अशा समाजाच्या सर्वच घटकांनी उत्स्फूर्तपणे या सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सकाळच्या वतीने करण्यात आले आहे. 

ही रॅली भिगवण चौकातून इंदापूर व गुनवडी चौकमार्गे, सिद्धेश्वर गल्ली, गोकुळवाडी, कोष्टी गल्ली, तांदूळवाडी वेस चौकमार्गे मारवाड पेठेतून राजस्थान दुकानापासून वळून श्रीराम गल्ली मार्गे खाटीक गल्लीतून सुभाष चौक मार्गे पुन्हा शारदा प्रांगणात येईल. या मार्गावर सिद्धेश्वर गल्ली व श्रीमंत आबा गणपती समोर नागरिकांना प्लॅस्टिकमुक्तीची शपथ देण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today Cycle Rally in baramati