#WeCareForPune : आजचा दिवस घरातच!

We-care-for-pune
We-care-for-pune

‘जनता कर्फ्यू’साठी पुणेकर सज्ज; प्रशासनाकडूनही तयारी
पुणे - कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून ‘जनता कर्फ्यू’साठी पुणेकर सज्ज झाले आहेत. रविवारी (ता. २२) दिवसभर घराबाहेर न पडता कोरोनाला पळवून लावण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. प्रशासनानेही आवश्‍यक यंत्रणा सज्ज केली आहे.

नव्या रेसिपीजसह बरेच काही
घरी दिवसभर काय करायचे, याचे अनेक प्लॅन कुटुंबामध्ये करण्यात आले आहेत. यात अनेकांनी नवनवे पदार्थ बनविण्यासाठी विविध रेसेपीज डाऊनलोड केल्या आहेत. त्यासाठी आजच सर्व तयारी करण्यात आली आहे. काहींनी विविध प्रकारच्या वेबसीरिज पाहण्याचे निश्‍चित केले आहे. काहींनी पत्ते खेळणार असल्याचे सांगितले, तर काहींनी यानिमित्ताने घरातील साफसफाई आणि आवराआवर करणार आहोत, असे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

बससेवा २५ टक्केच
संपूर्ण शहर बंद असले, तरी दोन्ही महापालिकांचे पाणीपुरवठा, सफाई, वीज तसेच पोलिस, महावितरण आदी अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहाता यावे, यासाठी पीएमपीची २५ टक्केच बससेवा सुरू राहणार असल्याचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले. नागरिकांनी शक्‍यतो रविवारी दिवसभर घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दूध, औषधे मिळणार
‘जनता कर्फ्यू’मध्येही दूध आणि औषधांचा पुरवठा सुरू राहणार आहे. नागरिकांना सकाळी लवकर दुधाचा पुरवठा होणार आहे. अनेकांनी आजच दुधाचा जादा साठा करून ठेवला आहे. याशिवाय, औषधांची दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही.

मोलकरणींना सुटी
पंतप्रधानांच्या आवाहनास प्रतिसाद देत अनेक गृहनिर्माण सोसायटीमध्ये तसेच वैयक्तिक पातळीवर मोलकरणींना सुटी देण्यात आली आहे. घरातील सर्व कामे स्वतः करण्याचा संकल्प गृहिणींनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २२) ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. त्याला नागरिकांनी प्रतिसाद देऊन दिवसभर घरातच थांबावे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी ‘जनता कर्फ्यू’ला शंभर टक्‍के प्रतिसाद द्यावा.
- डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त

कोरोनाविरोधातील लढाईला बळ देताना पुणेकरांनी ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभागी व्हावे. या रोगाला रोखण्यासाठी केवळ एक दिवसच नव्हे, तर सलग पंधरा दिवस पुरेपूर काळजी घ्यायची आहे. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडू नये. ज्येष्ठांची काळजी घ्यावी.
- शेखर गायकवाड, आयुक्त, महापालिका

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’चे नागरिकांनी गांभीर्याने पालन करावे. बाहेर न फिरता घरामध्येच राहावे. मागील काही दिवसांपासून बहुतांश नागरिकांनी घरी राहणे पसंत केले आहे. त्याच पद्धतीने रविवारीही आपल्या घरीच थांबावे. 
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त

कोरोनाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण देशाची एकत्र कृती आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले असून, कुटुंबासह मी त्यात सहभागी होणार आहे. सैनिक व स्वच्छतादूतांसाठी सायंकाळी पाच वाजता टाळ्या वाजवून मानवंदना देणार आहे. 
- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

कोरोनाचा वैयक्तिक धोका कमी असला, तरी सामाजिक धोका मोठा आहे. शहर ‘लॉकडाऊन’ करणे आवश्‍यकच आहे. सध्या यावर उपचार उपलब्ध नसल्याने सामाजिक अंतर ठेवून हा लढा आपण यशस्वी करू शकतो. 
- डॉ. अतीश दाभोळकर, सैद्धांतिक भौतिकी शास्त्रज्ञ, संचालक आयसीटीपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com