पुरंदरच्या खानवडीला आज ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AjiT Pawar

पुरंदरच्या खानवडीला आज ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलचे भूमिपूजन

सासवड - इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या इंग्रजी माध्यमाच्या ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलचे भूमिपूजन उद्या सोमवार ता.९ रोजी सायंकाळी पाच वाजता महात्मा फुले यांच्या जन्मगावी खानवडी, ता.पुरंदर येथे होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सीबीएसई स्वरूपातील ही नियोजित मुलींची निवासी शाळा आहे. सासवड तालुका पुरंदर येथे आमदार संजय जगताप यांनी ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. या शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या बहुचर्चित शाळेसाठी राज्य सरकारने मंजुर केलेल्या १२एकर गायरान जमिनीचा ताबा नुकताच मिळाला असुन महात्मा फुले नॉलेज पार्क संकल्पनेअंतर्गत तीन एकरावरच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन होत असल्याची माहिती आमदार संजय जगताप यांनी दिली. फियाट कंपनीच्या सीएसआर फंडातून हे काम होणार आहे. कार्यक्रमास फियाट कंपनीचे अध्यक्ष रवी गोंगिया, उपाध्यक्ष राकेश बावेजा देखिल उपस्थित राहणार आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात येत असलेल्या या शाळेसाठी खानवडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत रूपांतर करण्यास शालेय शिक्षण विभागाने २२फेब्रुवारी २०२२ रोजी परवानगी दिली असल्याचेही जगताप यांनी या वेळी सांगीतले. प्रस्तावित शाळेसाठी राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात एक कोटीची तरतूद केली आहे. या भागांतील जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरगे, महात्मा फुले स्मारक समितीचे अध्यक्ष सुदाम इंगळे, खानवडी गावच्या सरपंच स्वप्नाली होले, उप सरपंच स्वप्नील होले आदी कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. पत्रकार परिषदेस गटविकास अधिकारी अमर माने, कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, सुदाम इंगळे, सुनीता कोलते, संभाजी जगताप, गणेश जगताप, कैलास इंगळे, अनिल उरवणे आदी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सीबीएसई स्वरूपातील ही नियोजित मुलींची निवासी शाळा आहे. शिवाय कौशल्य विकासावर भर राहील., मुलींसाठी राहण्याची व्यवस्था असेल. दुर्बल घटकांना व स्थानिकांनाही प्राधान्य राहील. प्रारंभी 300 जागांनी सुरुवात करून विद्यार्थिनी क्षमता 2 हजार पर्यंत वाढविण्यात येईल., असेही माहितीत आमदार संजय जगताप यांनी सांगितले. त्याशिवाय लगतच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाच्या 33 लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भूमिपूजनही उद्याच कार्यक्रमावेळी होणार आहे.