''सगळं कधीच संपत नाही'' हे शिकविणारा नेता...शरद पवार!

Today Sharad Pawar completed  54 years political career.jpg
Today Sharad Pawar completed 54 years political career.jpg

जीवनात यशस्वी व्हायच असेल तर संकटांना डगमगून न जाता खंबीरपणे वाटचाल करायला हवी. संकटे ही तत्कालिक असतात आणि परिस्थिती कधीच एकसारखी राहत नाही, ती सतत बदलत असते, मात्र यशाची शिखरे गाठण्यासाठी धैर्य आणि संयम गरजेचे असतात, ही बाब संपूर्ण राज्याने नुकतीच पाहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याच्या विधानसभा निवडणूकीत जो करिष्मा घडवून दाखविला त्या नंतर संकटावर मात करण्याच्या बाबतीत त्यांची कामगिरी एक मैलाचा दगड ठरलेली आहे. टोकाची संकटे आली तरी हार मानायची नाही आणि परिस्थितीवर मात करुन यश संपादन करायचे असते हा मूलमंत्र शरद पवार यांनी या निवडणूकीच्या निमित्ताने आबालवृध्दांना दिला. पाच दशकातील आपल्या अफाट अनुभवाच्या जोरावर राज्याचे चित्र त्यांनी बदलून दाखविल्यानंतर एक नवा मापदंड प्रस्थापित झाला. 

22 फेब्रुवारी हा दिवस शरद पवार यांच्या जीवनातील महत्वाचा दिवस. बरोबर 54 वर्षांपूर्वी ते बारामती विधानसभा  मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले. त्या नंतर सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवार हा अखंडीतपणे आजही सुरुच आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद या राज्याच्या व देशाच्या सर्वोच्च सभागृहात सातत्याने कार्यरत राहण्याची किमया त्यांनी घडवून दाखवली आहे. संरक्षणमंत्री, कृषीमंत्रीपदासह मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यासह अनेक महत्वाच्या संस्थांच्या प्रमुखपदाची जबाबदारी आजही त्यांच्या खांद्यावर आहे. 

54 वर्षांचा त्यांचा राजकीय प्रवास खरोखरीच अचंबित करणारा आहे. कधीही पराभव न स्विकारणारे आणि सातत्याने माणसात राहणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. हेलिकॉप्टरमधूनही नद्यांसह शिवारांची खडा न खडा माहिती देणारे आणि दिल्लीत जाऊनही शेतातील मातीशी घट्ट नाळ जोडून ठेवणारे नेते म्हणून आज त्यांना मान्यता आहे. 

एका वेगळ्याच उंचीवर आज ते जाऊन पोहोचले आहेत. ठरवल तर काहीही अशक्य नसत याची प्रचिती राज्यात राजकीय परिवर्तन घडविताना त्यांनी दाखवून दिली. वयावर काहीही अवलंबून नसते, प्रबळ इच्छाशक्ती हीच ख-या अर्थाने महत्वाची ठरते हे त्यांनी त्यांच्या 54 वर्षांच्या राजकीय प्रवासात दाखवून दिले आहे. 

ऐंशीच्या उंबरठ्यावर असताना पायाला भिंगरी लावून राज्यात फिरुन असाध्य ते साध्य करुन दाखविण्याची किमया पवारसाहेब करु शकत असतील तर तसाच बदल प्रत्येक जणच आपापल्या आयुष्यातही करु शकतो, हेच उदाहरण त्यांनी सर्वांसमोर ठेवले. राजकारण असो किंवा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही वाटचाल करत असाल, संकटांनी खचून जायच नाही, उमेद कायम ठेवत मनावर संयम राखत निश्चयाने वाटचाल करत राहीलो तर यश आपल्या मागे आपोआपच येते हेच त्यांच्या इतक्या वर्षांच्या झंझावातानंतर दिसते. 

स्वकीय एकामागोमाग एक सोडून निघालेले, परिस्थिती अत्यंत प्रतिकूल, सत्ता नसताना कोणतीही यंत्रणा सोबत नव्हती, तरीही हार न मानता चिकाटीने लढत राहिलेल्या या ऐंशी वर्षांच्या युवकाची कहाणी सर्वांनाच अचंबित करुन जाणारी होती. अनेक संदर्भ बदलणारी आणि अनेक नवीन मापदंड प्रस्थापित करणारी ही कामगिरी होती. यात राजकीय संदर्भ जगजाहिरच आहेत. सर्वात जास्त लक्षवेधी बाब होती ती पवारसाहेबांची कामाप्रती असलेली दृढनिष्ठा आणि एकाग्र होऊन ध्येय निश्चित करुन त्या ध्येयाच्या दिशेने केलेली वाटचाल. 

संकटे आली तरी न डगमगता, सातत्य कायम राखत, संयम कोठेही ढळू न देता, अचूकपणे शब्दपेरणी करत अनुभवाचा पुरेपूर वापर करत त्यांनी राज्याचे राजकीय चित्र बदलवून दाखविले. ठरवल तर काहीही होऊ शकत, जगात अवघड बरच काही आहे मात्र अशक्य काहीही नसते हेच या निवडणूकीनंतर दिसून आले. 

शरद पवार हे राजकारणात सक्रीय आहेत म्हणून केवळ राजकीय कसोटीवरच याचा दाखला देणे चुकीचे ठरेल, जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकालाच हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरेल. 

कोणतीही माहिती नसताना मिसुरड न फुटलेली पोर जेव्हा सोशल मिडीयावर शरद पवारांविषयी काहीही लिहीतात, तेव्हा पवारांना जवळून ओळखणारे व्यथित होतात. लिहीण्याविषयी कोणाचच दुमत नाही, टीका करायचाही सर्वांनाच लोकशाहीने अधिकार दिलेला आह, मात्र टीका करण्यापूर्वी शरद पवार एकदा समजून घ्यायला हवेत, मगच मते व्यक्त केली तर ते अधिक उचित ठरेल. 


गेल्या पन्नास वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार पाहिल्यानंतर, अनेक जहरी टीकेला सामोरे गेल्यानंतर, अनेक जिवाभावाचे सहकारी सोडून गेल्यानंतर, अनेक चुकीचे बदनामी करणारे आरोपही झाल्यानंतरही कोठेही कोणताही संयम ढळू न देता आपल्या ध्येयाच्या दिशेने वेगाने वाटचाल करण्याचे काम त्यांनी कधी सोडले नाही, हा त्यांचा आदर्श प्रत्येक युवकाने घेण्यासारखा आहे. शरद पवारांवर उठसूठ टीका करण्यापेक्षा हा माणूस वाचायला शिका, हाच संदेश युवापिढीपर्यंत जाणे ही गरज आहे.

 टीका करण्याइतके सोपे काम जगात दुसरे नाही पण माणसांमधील गुणग्राहकता हेरुन त्याला योग्य संधी देत मोठे करण्याची कला शरद पवार यांनी जोपासली, अनेकांना संधी देत घडवून मोठे केले. कोणताही गवगवा न करता शांतपणे वाटचाल सुरु ठेवण्याचे कसब त्यांनी अंगी बाणवले आहे.  

एखाद संकट आल की सगळ संपल अशा अविर्भावात तलवार म्यान करणारी, नैराश्येने ग्रासणारी, टोकाची पावले उचलून तातडीने निर्णय घेणा-या युवा पिढीने या बुजुर्गाच्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. अंगी असलेली प्रगल्भता, जीवनात प्रत्येक गोष्टीकडे एका व्यापकतेने पाहण्याची त्यांची शैली, या वयातही युवकांकडून नवीन काहीतरी सतत शिकण्याची असलेली तयारी, नवीन पिढीला सातत्याने संधी देण्याचा त्यांचा स्वभाव अशा एक ना हजारो गोष्टी त्यांच्याकडून सहजतेने शिकता येण्यासारख्या आहेत. जीवनाकडे सकारात्मकतेने बघा, विधायकतेकडे वाटचाल करा आणि सातत्याने वाटचाल करीत अशक्यप्राय शक्य करुन दाखवा हाच संदेश शरद पवार यांनी मध्यंतरीच्या वाटचालीतून प्रत्येकाला दिलेला आहे. त्यांच्या या कृतीकडे काही काळ राजकीय डावपेच म्हणून पाहण्यापेक्षाही काय घडू शकते या दृष्टीकोनातून पाहिले तर नव्याने अनेक गोष्टी समजतील, शिकताही येतील. त्यांच्या इतका विशाल व व्यापक दृष्टीकोन मनात ठेवला तर अनेक छोट्या गोष्टीतून बाहेर पडून आपणही यशाला गवसणी घालण्याचा नक्कीच प्रयत्न करु यात शंका नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com