Pune : आजची ताजी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

आजची ताजी बातमी

sakal_logo
By
सु. ल. खुटवड-सकाळ वृत्तसेवा

पोलिसांच्या फौजफाट्यासह जिल्हाधिकाऱ्यांची पिवळ्या दिव्याची गाडी पाहून पदपथावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. कोणीतरी मोठा साहेब अतिक्रमण हटवण्यासाठी आला असावा, असा अनेकांचा समज झाला. त्यामुळे आपापल्या वस्तू घेऊन, विक्रेत्यांनी पोबारा केला. गाडीतून उतरून, पेपरस्टॉलच्या दिशेने गौरव सावकाश चालू लागला. स्टॉलवरील आपले पेपर जप्त होणार, अशी भीती पेपरविक्रेते दिनूमामाच्या मनात आली. तेवढ्यात गौरव स्टॉलवर आला व दोन-तीन पेपर हातात घेऊन, ‘‘आजची ताजी बातमी...’ असे म्हणून जोर जोरात ओरडू लागला. त्याचं हे वागणं पाहून, सगळेचजण अवाक झाले.

सुटा-बुटातील व्यक्ती पेपर विकत असल्याचे पाहून रस्त्यावरून जाणारी गर्दीही काही काळ थबकली. दिनूमामांच्या चेहऱ्यावर आश्‍चर्याचे भाव उमटले. तरीही हात जोडून ते म्हणाले, ‘‘साहेब, गेल्या तीस वर्षापासून मी येथे पेपरविक्रीचा व्यवसाय करतोय. माझी त्याच्यावरच रोजी-रोटी चालते. प्लीज पेपर जप्त करू नका.’’ त्यावर दिनूमामाचा हात हातात घेऊन गौरव म्हणाला, ‘‘मामा, मी तुमचा गौऱ्या आहे. पंधरा-वीस वर्षापूर्वी मी घरोघरी पेपर टाकायचो. त्यानंतर दिवसभर तुमच्याबरोबर येथंच पेपर विकायचो. आठवतंय का?’’ हे ऐकून मात्र दिनूमामाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहायला लागले.

चौकात भीक मागून जगणारा पाच वर्षांचा गौऱ्या त्यांना आठवला. ‘मला आई- बाप कोणी नाही. मला एक रुपया द्या’ असं म्हणून दिनूमामाकडे त्याने हात पसरले होते. त्यावेळी ‘भीक मागण्यापेक्षा माझ्यासोबत पेपर वीक. तुला दिवसाला पन्नास रुपये देतो’ असा प्रस्ताव दिनूमामाने त्याच्यासमोर ठेवला. बरेचसे आढेवेढे घेतल्यानंतर गौरव त्यासाठी तयार झाला आणि त्यानंतर ‘आजची ताजी बातमीऽऽऽ’ हा त्याचा खणखणीत आवाज पुढील दहा वर्षे त्या चौकात घुमत राहिला. नुसते पेपर विकण्यापेक्षा दिनुमामाने त्याला शाळेतही घातले. शाळा सांभाळून पेपरविक्रीच्या कामात तो तरबेज झाला. वाचनाची गोडी त्याला लागली आणि मग तो सगळे पेपर, साप्ताहिके आणि मासिकांचा वाचून फडशा पाडू लागला.

लहान वयातच जगभरातील घडामोडी त्याला पाठ झाल्या आणि तेथेच त्याच्या स्पर्धा परीक्षेचा पाया रचला गेला. गौरव आठ वर्षांचा असतानाची घटना दिनुमामाच्या डोळ्यासमोर अजून तरळते. पावसापासून वाचण्यासाठी मामाने त्याला प्लास्टिकचा रेनसूट दिला होता. मात्र, एकदा जोराचा पाऊस आल्याने पेपर भिजण्याची शक्यता वाटल्याने त्याने तो रेनसूट पेपरवर टाकला व स्वतः पावसात भिजत राहिला. थोड्यावेळाने मामा आल्याने समोरचे दृश्‍य पाहून त्यांनी गौरवला कडेवर घेऊन, ‘असा वेडेपणा परत करू नकोस’ असे दटावले.

एका क्षणात मामांच्यापुढे भूतकाळ उभा राहिल्याने त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. सतत पेपर वाचण्याच्या सवयीने गौरवला स्पर्धा परीक्षेची गोडी लागली. मामानेही त्याला वाचनापासून कधी हटकले नाही. उलट प्रोत्साहन देत राहिले. पुढे काही दिवसांनी गौरवला मुंबईतील एका खासगी कंपनीत क्लार्क म्हणून नोकरी लागली. नोकरी करत असतानाच तो ‘आयएएस’चा अभ्यास करू लागला. गौरवला जुने दिवस आठवल्याने त्याला भडभडून आले.

‘‘मामा, तुमच्यामुळेच रस्त्यावर भीक मागणारा मुलगा आज जिल्हाधिकारी झाला आहे. तुमचे उपकार मी कसे फेडू?’’ गौरव बोलला.

‘‘गौरव, पेपरच्या व्यवसायामुळं माझं उत्तम चाललंय. चांगले विचार व आचार असल्यावर आयुष्यात काही कमी पडत नाही, असा माझा अनुभव आहे. त्यामुळं मी खूप आनंदात आहे. मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही. मात्र, तू सुद्धा एका गरीब मुलाचं आयुष्य मार्गी लावशील, एवढंच वचन मला दे.’’ दिनुमामानं असं म्हटल्यावर गौरवने साश्रुनयनाने त्याला होकार दिला आणि हे आगळे वेगळे दृश्‍य पाहून गर्दीतील अनेकांचे डोळे पाणावले.

loading image
go to top