
दौंडच्या नदी पट्ट्यात बिबट्याची दहशत
यवत, ता. ३१ : दौंड तालुक्यात मुळा-मुठा नदी किनारी असलेल्या गावांमध्ये बिबट्याची मोठी दहशत वाढली आहे. कुत्री व जनावरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतकरी धास्तावले आहेत. वनविभागाने काहीतरी हालचाली करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
दौंड तालुक्यातील नदीपट्ट्यातील व ऊस क्षेत्र असलेल्या सर्वच गावांमध्ये सध्या बिबट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. अनेक ठिकाणी बिबटे लोकांना घाबरेनासे झाले आहेत. त्यामुळे काही दिवसांनी ते लोकांवरही हल्ले करण्यास कमी करणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, अनेकदा तक्रारी करूनही वनविभाग ही बाब गांभिर्याने घेत नाही. ते माणसांवरच्या हल्ल्याची वाट पाहात आहेत का? असा नागरिक सवाल करत आहेत.
नदी पट्ट्यात काही वर्षांपूर्वी रानडुकरांचा सुळसुळाट झाला होता. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत होते. मात्र, त्यांचा किमान जिवाला तरी धोका नव्हता. अलीकडील एक दोन वर्षांमध्ये रानडुकरांचा प्रादुर्भाव कमालीचा कमी झाला आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येने घाबरून ही डुकरे पळाली असावीत किंवा आजवर या बिबट्याची रानडुकरांवर गुजराण होत असावी. त्यांची संख्या संपताच त्यांनी आपला मोर्चा जनावरे व कुत्र्यांकडे वळवला असावा, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. बिबट्याने शेळ्या, वासरे, जनावरे यांच्यावर हल्ले करून त्यांचा जीव घेतल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र, या भागातील गावांमधील कुत्र्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी होत चालली असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
बिबट्याच्या मोठी दहशत गावागावांमध्ये आहे. माझ्या पूर्ण वाढ झालेल्या कुत्र्यावर दोनच दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केला. मात्र, आम्ही केलेल्या आरडाओरड्यामुळे कुत्र्याचे प्राण वाचले. त्याच्या पायाला बिबट्याने पकडल्याने जखम झाली. त्यामुळे आमच्या कुटुंबातील व वस्तीवरील कोणी रात्री अपरात्री व एकट्याने शेतात जायला धजावत नाहीत.
- वसंत कांबळे, शेतकरी, उंडवडी (ता. दौंड)
लेखी तक्रारी करा : वनविभाग
याबाबत विचारले असता वनविभागाकडून सांगण्यात आले की, संबंधित ग्रामपंचायतींनी वनविभागाकडे लेखी तक्रारी केल्या पाहिजेत. त्यावरून आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून त्याची दखल घेतली जाईल. त्यानंतर पिंजरा किंवा इतर उपाय योजले जातील.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..