सांगवी परिसरात पोलिस चौकीची मागणी

सांगवी परिसरात पोलिस चौकीची मागणी
Published on

माळेगाव, ता. ११ : नीरा नदीमधील वाळू तस्करी असो, अथवा घरफोड्या व दारू भट्ट्या, असे अनेक महत्वपूर्ण गुन्हे बारामती आणि फलटण (जि. सातारा) तालुक्यातील पोलिसांच्या हद्दीच्या वादामुळे बाजूला पडतात. त्याचा पुरेपुर फायदा सांगवी, खांडज, नीरावागज, घाडगेवाडी आदी परिसरातील गुन्हेगार घेत आहेत. त्यामुळे संबंधित गावात नेहमीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमिवर कायमचा मार्ग काढण्यासाठी सांगवी (ता. बारामती) येथे कायमस्वरूपी पोलिस चौकी करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
बारामती-फलटण राज्यमार्गावरील सांगवी हे तालुक्याच्या दक्षिणेच्या बाजूचे शेवटचे गाव आहे. या गावालगत नीरा नदीचे पात्र आहे. नदीच्या अलीकडे बारामती तालुक्याची हद्द संपते, तर पलिकडे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याची हद्द सुरू होते. बारामती पोलिस ठाण्याच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या माळेगाव पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांना सांगवी, खांडज, नीरावागज, घाडगेवाडी, शिरवली, कांबळेश्वर या नदीकाठच्या गावांत निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळणे अडचणीचे होते. त्याचा वाळू तस्करी करणारे, हात भट्टीची दारू काढणारे, तसेच घरफोडी, दरोडे टाकणारे सराईत गुन्हेगार अधिकचा फायदा घेतात. अनेक गुन्हे बारामती आणि फलटण पोलिसांच्या हद्दीच्या वादातून बाजूला पडतात. या प्रतिकूल स्थितीवर कायमचा मार्ग काढण्यासाठी सांगवी येथे स्वतंत्र पोलिस चौकी व्हावी, यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
याबाबत सांगवची माजी सरपंच अनिल तावरे म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून शासनस्तरावर बारामती तालुक्यात दोन पोलिस ठाणे नव्याने मंजूर झाली आहेत. त्यामध्ये माळेगाव व सुपे गावाचा समावेश आहे. नव्याने मंजूर झालेल्या माळेगाव पोलिस ठाण्याअंतर्गत खरेतर सांगवीसह नीरा नदीकाठची अनेक गावे येत आहेत. या गावांना सोयीचे आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सांगवीला स्वतंत्र पोलिस चौकी होणे खूप गरजेचे आहे. सांगवीला स्वतंत्र पोलिस चौकी मंजूर झाल्यास एक अधिकारी व ८ ते १० पोलिस कर्मचारी मिळण्यास कोणतीच अडचण राहणार नाही. तसे झाल्यास कायदासुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमिवर आम्ही गावकरी अजितदादांकडे पाठपुरावा करीत आहे.’’

तीन पोलिस चौक्या प्रस्तावित
बारामती तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत औद्योगिक विभागासह सांगवी, नीरावागज, माळेगावसारखी मोठी लोकसंख्या असलेली अनेक गावे येत आहेत. या शिवाय माळेगाव कारखाना, शारदानगर व शिवनगर शिक्षण संस्था, पवारसाहेबांचे निवासस्थान आदी महत्त्वपूर्ण बाबींचा विचार करता सरकारने माळेगावला स्वतंत्र पोलिस ठाणे मंजूर केले आहे. या ठाण्याच्या इमारतीचेही बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. माळेगाव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत नव्याने तीन पोलिस चौक्या व्हाव्यात, यासाठी सांगवी, शारदानगर आणि कऱ्हावागज गावकऱ्यांची मागणी आहे. त्यासंबंधीचा अहवाल आम्ही उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात सादर केला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरिक्षक राहुल घुगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Inauguration of the 38th Pune Festival by Vice President C.P. Radhakrishnan
Kasba Ganpati Installed in Houston, Texas for Golden Jubilee
Attempt to Murder Using Tractor in Malegaon Shivnagar
Opposition to Mess Price Hike and Demand for University Subsidy
Marathi News Esakal
www.esakal.com