शेतकऱ्यांना उसाचा गोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांना 
उसाचा गोडवा
शेतकऱ्यांना उसाचा गोडवा

शेतकऱ्यांना उसाचा गोडवा

sakal_logo
By

शेतकऱ्यांना
उसाचा गोडवा

पुणे जिल्ह्यात पाच लाख शेतकरी ऊस उत्पादन घेत असून, त्यांचा प्रपंच जिल्ह्यात असलेल्या अठरा साखर कारखान्यांवर अवलंबून आहे. दहा वर्षांपूर्वी जेमतेम चाळीस-पन्नास लाख टन ऊस जिल्ह्यात पिकत होता. मात्र, आता तोच ऊस दुपटीवर म्हणजेच सव्वाशे लाख टनांवर पोचला आहे. या ऊस उत्पादनवाढीमुळेच बारा सहकारी साखर कारखान्यांमध्ये सहा खासगी कारखान्यांची वाढ झाली आहे. यानंतरही ऊस अतिरिक्तच होऊ लागल्याने कारखाने आता विस्तारीकरणही करत आहेत, ही समाधानाची बाब आहे. परंतु, भावाबाबत मात्र जिल्ह्यात मोठी तफावत आहे. काही सहकारी कारखाने आर्थिक अडचणींशी झुंजत आहेत. अशात खासगीचेही ‘सहकारा’पुढे कडवे आव्हान आहे. सरकारी धोरणांतही चढ-उतार होत आहे. त्यामुळे जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेले कारखाने स्वयंपूर्ण होण्यासाठी दूरदृष्टीने पावले टाकावी लागणार आहेत.

- संतोष शेंडकर, सोमेश्‍वरनगर

पुणे जिल्ह्यात भात, ऊस, गहू, कांदा ही प्रमुख पिके आहेत. दहा वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यात उसाचे पन्नास लाख टन पीक घेतले जात होते. अलीकडच्या काळात जिल्ह्यातील विविध योजनांमधून सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांनी प्रचंड खर्च करून वैयक्तिक व सामूहिक उपसा सिंचन योजना राबवत बारमाही सिंचनाखाली मोठे क्षेत्र आणले आहे. याशिवाय नगदी पीक आणि खात्रीने भाव देऊ शकणारे पीक म्हणून लोक उसाकडे मोठ्या आशेने आहेत. उसाला कमीत कमी एफआरपी (रास्त व उचित दर) मिळणे हे कायद्याने बंधनकारक असते. अन्य पिकांबाबत तसे नाही. केंद्र सरकार तेवीस प्रकारच्या पिकांना हमीभाव देत असले; तरी त्या हमीभावाला संरक्षणाची कुठलीही तरतूद नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत ऊस तारणहार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकच एक पीकपद्धती फारशी हितावह नाही. मात्र, जिल्ह्यातील धान्य, फळबागा, पालेभाज्या, फळभाज्या अशी पिके म्हणजे ‘मटका’ झाला आहे. त्यामुळे खात्रीचा दर देऊ शकणाऱ्या उसाचे क्षेत्र वाढले आहे. याशिवाय मागील तीन वर्ष चांगला पाऊस होत असल्याने जिराईत भागातील शेतकरीही उसाकडे वळला आहे. परिणामी चालू हंगामासाठी तब्बल एकशे पस्तीस लाख टन म्हणजे दुपटीपेक्षा जादा ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. जिल्ह्यात यावर्षी सुरू असलेल्या सोळा कारखान्यांनाही हा ऊस कसा संपवायचा? याची चिंता पडली आहे. याशिवाय दौंड, शिरूर, बारामती, फलटणमधील सुमारे पाचशे उसाची गुऱ्हाळेही अतिरिक्त उसामुळे जोमात चालली आहेत. सुमारे पाच लाख शेतकऱ्यांचा हे पीक आधार झाले आहे. त्यामुळे सरासरी एफआरपीनुसार केवळ ऊस पिकाची तीन हजार कोटींची उलाढाल होणार आहे.

खासगीची संख्या वाढली सहकाराची घटली
पुणे जिल्ह्यात आजमितीला एकूण अठरा साखर कारखाने आहेत. त्यापैकी सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती, घोडगंगा, कर्मयोगी, नीरा भीमा, विघ्नहर, भीमाशंकर, संत तुकाराम, राजगड, भीमा पाटस व यशवंत असे बारा सहकारी कारखाने आहेत. त्यामधील सोमेश्वर, माळेगाव, भीमाशंकर, विघ्नहर हे सध्या तगडे कारखाने आहेत. संत तुकाराम, घोडगंगा हेही चांगले कारखाने आहेत. सोमेश्वर, माळेगाव हे तर कोल्हापूर, सांगलीपेक्षा कमी साखर उतारा असतानाही राज्यातील सर्वोच्च भाव देण्याच्या क्षमतेचे कारखाने बनले आहेत. एरवी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखान्यांचा राज्यात दबदबा असायचा. पुणे जिल्हा मागे राहायचा. मात्र, मागील काही वर्षात जिल्ह्यातील कारखान्यांचा राज्याच्या कारखानदारीत वट तयार झाला आहे. राज्याचे पुरस्कारही जिल्ह्यातील कारखाने पटकावू लागले आहेत. सहकारापैकी कर्मयोगी, नीरा भीमा, छत्रपती हे इंदापूरचे कारखाने आर्थिक अडथळे पार करत सुरळीत होण्याचा प्रयत्न करत आहेत. या तिन्ही कारखान्यांना चालू हंगामात विनापरवाना गाळप केल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी दंड ठोठावला आहे. राजगड हा चालू हंगामात अडखळत चालला आहे. बारा सहकारीपैकी गैरव्यवस्थापनामुळे यशवंत बंद पडला असून, चालू हंगामातही तो चालू होऊ शकला नाही. भीमा-पाटस हा जिल्ह्यात सर्वात मोठा व सर्वाधिक गाळप करणारा कारखाना आचके देत असून, कर्जबाजारी झाला आहे. चालू हंगाम या कारखान्याला घेता आला नाही, हे विशेष. त्यामुळे चालू हंगामात दोनने संख्या घटली असून, दहाच कारखाने गाळप घेत आहेत. दुसरीकडे दौंड शुगर, बारामती अॅग्रो या
मातब्बर कारखान्यांसह श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज हे खासगी कारखानेही आता जुने झालेत. त्यांच्यात नव्याने पराग अॅग्रो आणि व्यंकटेश कृपा या खासगी आधुनिक कारखान्यांची भर पडली आहे. एखादा अपवाद वगळता सर्वच खासगी कारखाने जोमात आहेत. बंद पडलेल्या यशवंतचा, भीमा-पाटसचा ऊस संपविण्याची जबाबदारी या खासगींनी उचलली आहे.

कारखाने बनलेत अर्थवाहिनी
चालू असलेल्या सोळा साखर कारखाने हा जवळपास पाच लाख ऊस उत्पादक आणि पंधरा हजार साखर कामगारांचा प्रपंच आहे. याशिवाय एक लाख ऊसतोड मजूर, व्यापारी, पुरवठादार, कंत्राटदार यांचेही जीवन या कारखान्यांवर अवलंबून आहे. अप्रत्यक्षरित्या सोसायट्या, पतसंस्था, बँका या वित्तसंस्था आणि असंख्य व्यापारी, दुकानदार, हॉटेलचालक, शिक्षणसंस्था यांची संजीवनीदेखील साखर कारखानेच आहेत. एकूणच साखर कारखाने ही जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सोमेश्वर, माळेगाव, भीमाशंकर अशा कारखान्यांनी शैक्षणिक संकुले उभारून सामाजिक जडणघडणीत भरीव योगदान दिले आहे. कारखान्याच्या परिसरात विविध बँका मजबूत झाल्या असून, पतसंस्थांचेही पेव फुटले आहे. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्याही कारखान्यांच्या ऊसबिलांवर अवलंबून आहेत. दिवाळीला ऊसबिले झाल्याशिवाय व्यापारी पेठांमध्ये हालचाल होत नाही.

उसाबरोबर कारखान्यांचाही विस्तार
जिल्ह्यात ऊसक्षेत्र वाढत गेले तशी कारखान्यांनाही आपल्या क्षमतेत वाढ करावी लागली आहे. उदा. अवघा १२५० टनांनी सुरू झालेला सोमेश्वर कारखाना सन १९९२ मध्ये २५०० टन प्रतिदिन क्षमतेचा झाला. सन २००७ नंतर तो ५५०० टन प्रतिदिनाचा झाला. आजमितीस तो सहा हजार टन प्रतिदिन क्षमतेने चालत आहे. तरीही ऊस संपत नसल्याने कारखान्याचे आणखी विस्तारीकरण सुरू असून, चालू हंगामातच फेब्रुवारीत तो ८५०० टन प्रतिदिन क्षमतेचा होईल. माळेगाव, भीमाशंकरनेही अडीच हजारांहून आता सहा-सात हजार टनांचा पल्ला गाठला आहे. दौंड शुगर, बारामती अॅग्रो जिल्हाशेजारील अंबालिका हे खासगी कारखानेही अजस्त्र झाले आहेत. कर्मयोगी आठ-दहा हजारांनी गाळप करणारा कारखाना आहे. तुलनेने राजगड सर्वात छोटा राहिला असून, त्यांचीही क्षमतावाढीसाठी प्रक्रिया सुरू आहे. यामुळे पाच वर्षापूर्वी जिल्ह्याची दैनंदिन गाळपक्षमता पन्नास हजार टन होती. आता तीच चालू हंगामात पंच्याऐंशी हजार टन प्रतिदिन झाली आहे. त्यापैकी सहकारी पन्नास हजार टन प्रतिदिन; तर खासगी पस्तीस हजार टन प्रतिदिन गाळप करत आहेत.

उसाच्या भावाची स्पर्धा
जिल्ह्यात कारखान्यांची संख्या वाढल्याने भावाची स्पर्धाही वाढली आहे. मागील काही वर्षात सोमेश्वर, माळेगाव, भीमाशंकर या तीन कारखान्यांचे भावाच्या बाबतीत निर्विवाद वर्चस्व आहे. सोमेश्वरने; तर सरत्या हंगामात राज्यात सर्वाधिक ३१०० रुपये प्रतिटन भाव दिला. तत्पूर्वी माळेगावनेही ३४०० रूपये प्रतिटन भाव देऊन राज्यातील वेगळा विक्रम नोंदविला होता. भीमाशंकरच्या भावातही सातत्य आहे. या तिन्ही कारखान्यांनी काट्याची कसरत करत चालू हंगामात एकरकमी एफआरपी देऊन शेतकऱ्यांना समाधानी केले आहे. तांत्रिक कार्यक्षमतेतून उत्तम साखर उतारा, चोख व्यवस्थापन, पारदर्शक ऊस लागवड व तोडणी कार्यक्रम अशी कारखान्यांच्या यशाची त्रिसूत्री आहे. हे कारखाने खासगी कारखान्यांनाही भावात कैक पटीने कायम मागे टाकत आले आहेत. किंबहुना खासगी कारखान्यांचा भाव यांच्या आसपासही नसतो, हे विशेष. काही सहकारी कारखान्यांना मात्र भावात वाढ करण्यासाठी विचार करावा लागणार आहे, हे निश्चित. घोडगंगा, छत्रपती, कर्मयोगी, नीरा भीमा, राजगड भावाबाबत सध्या मागे पडलेत, हे वास्तव आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारला, परंतु फडणवीस सरकारने दोन वर्ष वीजखरेदी करारच केला नाही. त्यामुळे घोडगंगाला आर्थिक फटका बसला. त्याला सावरण्यास वेळ लागत आहे. खासगीमध्ये दौंड शुगरसारखे कारखाने सहकाराशी टक्कर देत दर्जेदार भाव देत आहेत, हेही नमूद केले पाहिजे. जिल्ह्यात कारखान्यांच्या भावात फार मोठी तफावत आहे. सर्वाधिक भाव तीन हजार रुपये असेल; तर नीचांकी भाव बावीसशे ते तेवीसशे इतका असतो. प्रतिटन सातशे रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी कारखान्यांना दूरगामी विचार करावा लागणार आहे.

सहकारी कारखान्यांपुढे अस्तित्वाचे आव्हान
यशवंत आधीच बंद झाला आहे. आता भीमा-पाटसपुढे पुन्हा सुरू होण्याचे आव्हान आहे. राजगडही अडखळत चालत आहे. नीरा भीमा, कर्मयोगी, छत्रपती असे सहकारी कारखान्यांनाही अडचणींचा डोंगर पार करत सावरावे लागणार आहे. भीमा पाटस, यशवंत बंद राहिल्याने कामगार, शेतकरी देशोधडीला लागले. परिसराची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. खासगी कारखाने पर्याय म्हणून शेतकऱ्यांपुढे उभे असल्याने सहकारी कारखान्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. सरकारची सतत बदलणारी धोरणे कारखानदारीवर प्रतिकूल परिणाम करतात याशिवाय अतिरीक्त साखरेचे संकट, नीचांकी बाजारभाव याचा दबाव कारखान्यांवर प्रचंड झाला आहे. साखर विकली जात नसल्याने बँकांचे व्याज भरून कारखाने मेटाकुटीला आले आहेत. कामगारांचा पगार बारा टक्के वाढला आहे, ऊसतोडणी वाहतूक खर्चात चौदा टक्क्यांची वाढ झाली आहे, केमिकल व अन्य खर्चातही वाढ झाली आहे. दुसरीकडे साखरेचे भाव मात्र गेली दहा वर्ष तीन हजारांनाच चिकटून आहेत. त्यामुळे काटेरी कसरत कारखान्यांना करावी लागत आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांपुढील संधी
ग्लोबल वॉर्मिंगचा धोका जागतिक पातळीवर निर्माण झाल्याने जागतिक दबावाने का होईना केंद्र सरकारने इथेनॉलचे धोरण ताकदीने राबवण्यास सुरवात केली आहे. इथेनॉलला चांगले दरही देऊ केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारीने साखरेवर अवलंबून न राहता इथेनॉलकडे वळले पाहिजे. ज्यांच्याकडे प्रकल्प आहेत, त्यांनी त्यांची क्षमता वाढवायला हवी. बारामती अॅग्रो, शरयू, अंबालिका यासारखे कारखाने दररोज प्रत्येकी काही लाख लिटर अल्कोहोलनिर्मिती करतात. त्यांच्या मार्गाने सहकारी कारखान्यांना जावे लागणार आहे. कोल्हापूरच्या वारणा सहकारी साखर कारखान्याने थेट उसाचा रस वळवून त्यापासून इथेनॉलनिर्मिती केली आहे. तसे प्रयोग भविष्यात जिल्ह्यातही करावे लागणार आहेत. कर्मयोगी, नीरा भीमा, माळेगाव कारखाने जैवइंधन निर्मिती करून त्यावर ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर चालविण्याचा कौतुकास्पद विचार करत आहेत. याशिवाय सहवीजनिर्मिती प्रकल्पांमधूनही कारखाने चांगले पैसे उभे करत आहेत. कोरोनाकाळात काही कारखान्यांनी सॅनिटायझरनिर्मिती करून सामाजिक भान जपताना अर्थनिर्मितीही केली. याशिवाय साखरेचे ब्रँडींग करणे, मॉल्सला साखरपुरवठा करणे, जागतिक बाजारपेठेचा अंदाज घेऊन साखरनिर्यातीचे किंवा कच्च्या साखरनिर्मितीचे धोरण ठरविणे, अशी पावले विचारपूर्वक उचलावी लागणार आहेत. ब्राझीलसारखा सर्वाधिक साखरनिर्मिती करणारा देश मागील दोन वर्ष मागे पडला असून, भारताची बाजारपेठेवरील पकड वाढत आहे. या संधीचे सोने करण्यासाठी कारखान्याचे कारभारी दूरदृष्टीचे हवेत. कारखाने किती वर्ष सरकारवर अवलंबून राहणार आहेत? त्यांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी तेजीच्या काळात काही निधी उभारायला हवेत. बँकांना दरवर्षी केवळ साखरतारण कर्जापोटी पंचवीस-तीस कोटी रुपये व्याज देतो आणि बँका जगवतो, त्याऐवजी अन्य पर्याय शोधायला हवेत. तरच सहकारी साखर कारखानदारी टिकणार आहे.

भविष्यातील आव्हाने
- शेतकरी व शेतकरी संघटना एकरकमी एफआरपीसाठी आक्रमक झाल्या आहेत. एफआरपी देण्यासाठी बँकांकडून कोट्यवधी रुपयांचे मालतारण कर्ज उचलावे लागते. साखर वर्ष ते दीड वर्षात खपते. तोपर्यंत प्रत्येक पोत्याला महिन्याला तीस रुपयांचे म्हणजेच वर्षाला पंचवीस ते तीस कोटींचे व्याज भरावे लागत आहे. भावात प्रतिटन अडीचशे ते तीनशे रुपयांचा फटका बसत आहे. यासाठी ऊस किंमत निधीसारखे निधी निर्माण करावे लागणार आहेत.
- उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांकडे साखरेइतकेच लक्ष देऊन विस्तार करणे काळाची गरज आहे. याशिवाय खासगी कारखान्यांच्या धर्तीवर साखरविक्रीसाठी स्वतंत्रपणे तज्ज्ञ व्यक्तिची नियुक्ती करून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा अभ्यासातून कोट्यवधीचा नफा कसा पदरात पाडता येईल, यादृष्टीने विचार क्रमप्राप्त आहे.
- कारखान्यातील शुगर, डिस्टिलरी व सहवीजनिर्मिती या तिन्ही प्रकल्पांमधून बाहेर पडणारे प्रदूषणकारी पदार्थ झीरो लेवलवर आणण्यासाठी आधुनिकतेचा अवलंब करावा लागणार आहे. ‘झीरो डिस्चार्ज’ ही प्रदूषण नियंत्रण महामंडळाची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने यंत्रसामग्रीत बदल करणे, आधुनिक पद्धतीचे बॉयलर वापरणे, यासाठी पर्यावरण मंत्रालयाचा दबाव येणार आहे.
- ऊसतोड मजूर अनारोग्य, निवासाची गैरसोय, मुलांच्या शिक्षणाची आबाळ, शौचालयाचा अभाव अशा पायाभूत गोष्टींपासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आता सामाजिक, सरकारी, संघटनात्मक दबाव निर्माण होऊ लागला आहे. त्यादृष्टीने कारखान्यांना विकास योजनांचे टप्पे पाडावे लागणार आहेत.
- जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने ठिबक सिंचन प्रणाली बसविल्याशिवाय ऊस पिकाला पाणीवापरास परवानगी देणार नाही, असा निर्णय घेतला आहे. तो अमलात आणल्यास साखर कारखानदारीला धक्का बसू शकतो. तत्पूर्वी कारखान्यांनी पुढाकार घेऊन आपापल्या कार्यक्षेत्रात ठिबक सिंचन प्रणाली शेतकऱ्यांना माफक दरात मिळवून देण्यासाठी योजना आखल्या पाहिजेत. राज्य सरकारने आता ठिबक सिंचनाला पंच्च्याहत्तर टक्के अनुदान जाहीर करून चार पावले टाकली आहेत. दोन पावले कारखान्यांनी टाकणे आवश्यक आहे.
- पिढ्यानपिढ्या ऊस उत्पादन घेतल्याने साखर कारखाना कार्यक्षेत्रातील बहुतांश जमीनी क्षारपड झाल्या आहेत. उत्पादनावर फारसा परिणाम न होता या जमिनींना पूर्ववत करण्यासाठी संशोधन केंद्रांच्या सहकार्याने कारखान्यांना मोठी मोहीम राबवावी लागणार आहे. अन्यथा पुढील पंधरा-वीस वर्षात जमीनी लागवडीयोग्यही राहणार नाहीत. खतांचा समतोल वापर, सेंद्रिय व जैविक शेतीवर भर देणे, पाचट कुजविणे, अशा गोष्टींवर भर द्यावा लागणार आहे.
- ऊस पिकाचे क्षेत्र वाढल्याने आणि हवामान बदलाचा फटका बसल्याने चालू हंगामात उसावर एकाच वेळी सर्व रोगांचे आक्रमण झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र उसावर तांबेरा, लोकरी मावा, तपकिरी ठिपके असे रोग दिसत आहेत. याशिवाय मूळकूज, खोडकीड, शेंडेकीड, पिठ्या ठेकूण यांनीही उसाचे उत्पादन घटत आहे. उसाला अवकाळी पावसामुळे आणि वातारवणामुळे तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः फुले २६५ या शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या वाणावर जास्त रोगांचे आक्रमण झाले आहे. याबाबत कारखान्यांना सजग राहावे लागणार आहे. पिकांची फेरपालट, वाणांची फेरपालट करतानाच नवीन वाण विकसित करण्यासाठी संशोधन केंद्रांवर दबाव ठेवावा लागणार आहे.
- साखरेचा उतारा वाढविण्यासाठी ऊस लागवडीपासून लक्ष द्यावे लागते. ऊस लागवड ते तोडणी नियोजन, असा कार्यक्रम संगणकीकृत करणे अपेक्षित आहे. वशिल्याने ऊसतोड प्रकार पूर्ण पणे थांबल्याशिवाय आणि उसाची वेळेत तोड केल्याशिवाय चांगला उतारा मिळणे शक्य नाही. याशिवाय माळेगाव कारखान्याच्या धर्तीवर खरेदी-विक्रीची यंत्रणा ऑनलाइन करून कारभार अधिक पारदर्शक करून सभासदांचा विश्वास प्राप्त करावा लागणार आहे.
- कारखान्यांनी शिक्षणसंस्थांचे जाळे उभारले आहे. मात्र, ते प्रॉफिट तत्त्वावर नाही. उलट तिथे खर्च करावा लागतो. यासोबत कारखान्यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्स, खत व औषध पुरवठा, बियाणे पुरवठा, साखर विक्रीची होलसेल दुकाने असे उत्पन्नाचे अन्य पर्याय पाहिले पाहिजेत. भविष्यात कारखाना पातळीवरच साखर भरण्यासाठी लागणारी पोती तयार करण्याचा लघुउद्योग करून खर्चात बचत करण्यासारख्या गोष्टींचाही विचार करावा लागणार आहे.

पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारी आव्हाने पेलू शकेल, यात शंका नाही. बहुतांश कारखान्यांवर लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेली सक्षम नेतृत्व असल्याने आणि सभासद व कामगार जागरूक असल्याने जिल्ह्यातील कारखानदारीस भविष्य आहे. जिल्ह्यात माळेगाव, सोमेश्वरसारख्या कारखान्यांच्या वार्षिक सभा आठ ते दहा तास चालतात, यावरून याची कल्पना येऊ शकते. माजी केंद्रीय कृषिमंत्री यांचेही जिल्ह्यातील कारखान्यांवर विशेष लक्ष असते. काही कारखाने सध्या आर्थिक अडचणीत आहेत परंतु पुन्हा ‘यशवंत’ होणार नाही, याची काळजी सभासद, कामगार व संचालक घेतील, असा विश्वास वाटतो.

कारखाना प्रतिदिन गाळप (टन)
सहकारी
सोमेश्वर ५५००
माळेगाव ८५००
छत्रपती ८०००
घोडगंगा ४०००
कर्मयोगी ७५००
नीरा भीमा २५००
विघ्नहर ५५००
भीमाशंकर ६५००
संत तुकाराम ३५००
राजगड १२५०
यशवंत २५००
भीमा पाटस ८५००

खासगी
दौंड शुगर ७०००
व्यंकटेशकृपा ५०००
अनुराज शुगर ३०००
नाथ म्हस्कोबा ४५००
बारामती अॅग्रो ७५००
पराग अॅग्रो ४०००
....

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top