शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर न्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर न्या...
शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर न्या...

शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर न्या...

sakal_logo
By

सोमेश्‍वरनगर, ता. १ : ‘‘सोमेश्‍वर साखर कारखान्याच्या सन २०१८ मधील वार्षिक सभेत विस्तारीकरणासाठी मंजुरी दिली होती. परंतु, ती अनेक कारणांनी स्थगित झाली. आज शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उसाचे वेळेत गाळप होत नसल्याने काडी लावावी लागत आहे. अनेकांना अन्य कारखाने कमी भावात भरडत असून, ऊसतोड यंत्रणा पैसे उकळत आहे. आता तरी विस्तारवाढ लवकर करा आणि शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर न्या...’’ अशी कळकळीची मागणी सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांनी केली.
सोमेश्वर कारखान्याच्या सोमवारी (ता. २८ फेब्रुवारी) झालेल्या ऑनलाइन सभेत सभासदांनी विस्तारवाढीसाठीच्या स्वनिधीला मंजुरी दिली, पण सर्वाधिक चर्चा झाली ती शेतकऱ्यांच्या हतबलतेवर. फेब्रुवारी २०१८ मधील वार्षिक सभेत सहवीजनिर्मितीसह विस्तारवाढीचा ठराव मंजूर झाला, पण लगेचच साखरेचे भाव घसरले आणि अन्य राजकीय घडामोडी झाल्याने स्थगिती बसली. आता चालू हंगामात नोंदीचा तब्बल १४ लाख टन, तर बिगरनोंदीचा दोन लाख टन ऊस आहे. आठ लाख टन गाळप उरकले असले; तरी अजूनही आडसाली ऊसच तुटत आहे. पूर्वहंगामी, सुरू व खोडवा ऊस शेतात आहे. विशेषतः पुरंदर, बारामतीच्या जिराईत भागात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. काहीजण उसाला काडी लावून प्रतिटन आठशेची कपात सहन करून ऊस देत आहेत. काहीजण अन्य कारखान्यांना मिळेल त्या भावात ऊस देत आहेत. यापेक्षा अधिक परवड होऊ नये म्हणून सभासदांनी सध्याची आठ हजार टनांची विस्तारवाढही लवकर सुरू करा आणि पुढे दहा हजार टनांचा टप्पाही लवकर गाठा, अशी एकमुखी मागणी केली.
सरपंच रवींद्र भापकर यांनी, ‘ऊसतोड मजूर, ट्रॅक्टरचालक चार ते दहा हजार रुपये घेतात. बाहेरच्या कारखान्यांच्या टोळ्या तर पंधरा हजार रुपये उकळतात,’ अशी व्यथा मांडली. गणेश चांदगुडे यांनी पाणीटंचाईने होणाऱ्या जिराईत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. नंदकुमार जगताप यांनी पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या व्यथा लेखी स्वरूपात मांडल्या.

‘पुरंदरला स्वतंत्र युनिट उभारा’
पुरंदरचे ज्येष्ठ नेते सुदाम इंगळे यांच्यासह पोपटराव पानसरे, माणिक झेंडे म्हणाले, ‘‘मागील काळात विस्तारवाढ का झाली नाही, या खोलात न जाता आता तरी लवकर करा. जानाई-शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनांचे पाणी आलेय. गुंजवणीचेही येणार आहे. त्यामुळे पुरंदरमध्ये उसाचे क्षेत्र प्रचंड वाढत आहे. आताच्या विस्तारवाढीनंतर पुरंदर तालुक्यात स्वतंत्र छोटे युनिट उभारण्याबाबतही विचार करावा.’’ युवा नेते धैर्यशील काकडे यांनी, ‘नऊ-साडेनऊ हजारांवर थांबू नका. पंधरा हजार टनांचे विस्तारीकरण हवे,’ असे मत मांडले.