नगरपालिका निवडणुकीचे इच्छुकांना वेध

नगरपालिका निवडणुकीचे इच्छुकांना वेध

आळंदी, ता. १४ ः नगरपालिका निवडणूक जाहीर होण्याची वाट आळंदीकर पाहत आहेत. तोपर्यंत इच्छुक उमेदवारांची विविध मार्गाने मतदारांपर्यंत पोचण्यासाठीची धडपड जोरात सुरू आहे. यामधे जेवणावळीपासून मोफत पाणी वाटप, व्हॉटसअप एसएमएस तर विद्यमान नगरसेवकांनी दिनदर्शिका छापून विकासकामांतील योगदान जनतेला दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
आळंदी नगरपरिषदेची मुदत संपत आली आहे. आता निवडणुकीचे वेध इच्छुक आणि राजकीय मंडळींना लागले. यामधे विद्यमान नगरसेवक, इच्छुक मंडळी नागरिकांना न विसरता सुविचार आणि त्यासोबत स्वतःची छबी असलेला एसएमएस नित्याने पाठवीत आहेत. काही इच्छुकांनी मित्र मंडळींसोबत रोज जेवणाचा बेत मांडला आहे. एका इच्छुकाने विद्यमान सेनेच्या नगरसेवकासोबत दंड थोपटले असून कुठल्याही परिस्थीतीत माघार नाहीच अशी भूमिका घेतली. सोबत प्रभागातील मतदारांना मोफत पाणी वाटपही सुरू केले. याचबरोबर जुन्या नव्या राजकीय मंडळींच्या भेटीगाठींवर भर दिला जात आहे. गेली अनेक वर्षांपासून राजकारणात असलेली मंडळीही सध्या नगरसेवक नाहीत. मात्र, आळंदीच्या राजकारणाचा आपणच केंद्रबिंदू असल्याप्रमाणे इच्छुकांना घरी बोलावून एकमेकांच्या विरोधात वातावरण गरम करण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही स्वतंत्र पॅनेलच्या विचारात तर काही महाविकास आघाडीची मोट बांधण्याच्या तयारीत आहे. राजकीय मंडळींच्या पक्षिय कोलांट्या उड्यांमध्ये आळंदीतील राजकीय मंडळींच्या चर्चा सर्वश्रृत आहेत. यंदाही निवडणुकीपूर्वी अनेकजण गावकी भावकी सोडून अन्यत्र वळत आहेत. तर काही राजकीय पक्षांच्या बदलात आहेत.
विद्यमान उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे आणि सचिन गिलबिले यांनी पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेणारी सचित्र दिनदर्शिकाच छापून प्रभागात वाटपाचे काम सुरू केले. आदित्य घुंडरे यांनी काही कोटींच्या विकासकामांचा दावा दिनदर्शिकेच्या माध्यमातून केल्याने याबाबत उलटसुलट चर्चा जोरदार सुरू आहे. तर काही लोक दिनदर्शिकेचे कौतुकही नागरिक करत आहे. गेली चार पाच महिन्यांपासून काही इच्छुक सोयिस्कर मतदारांची नावे प्रभागातील मतदार यादीच नोंदवून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मतदार याद्यांमधील बोगस नावे वगळण्याची मागणीही केली जात आहे. एकंदर निवडणूक जाहीर होण्याची उत्सुकता ताणली. मात्र, मतदारांपर्यंत पोचण्याच्या प्रयत्नात अद्याप खंड पडला नसल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com