आंबेठाण बाह्यवळण रस्ता अखेर मार्गी

आंबेठाण बाह्यवळण रस्ता अखेर मार्गी

आंबेठाण, ता. ४ : मागील कित्येक वर्षांपासून रखडलेला आंबेठाण (ता. खेड) येथील बाह्यवळण रस्ता अखेर मार्गी लागला असून तात्पुरत्या स्वरूपात या कामाला सुरुवात करण्यात आली. हा रस्ता मार्गी लागण्यासाठी आंबेठाण गावातील काही खासगी जागा सार्वजनिक बांधकाम विभागाने खरेदी केली आहे. दररोज वाढत असणारी वाहतूक लक्षात घेता हा बाह्यवळण रस्ता तातडीने बनविणे गरजेचे होते. आता चाकण शहर आणि पुणे- नाशिक रस्ता ते एमआयडीसी टप्पा क्रमांक दोन दरम्यान अवजड वाहतूक शक्य होणार आहे. दैनिक सकाळने याबाबत वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून नागरिकांची होणारी अडचण मांडली होती.
आंबेठाण गावाच्या दोन्ही बाजूला रस्त्याचे रुंदीकरण आणि नूतनीकरण पूर्ण झाले होते. फक्त गावठाण परिसरात २०० मीटर जागेअभावी हे काम रखडले होते. गावात अरुंद आणि अतितीव्र वळणाचा रस्ता वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत होता.
काही महिन्यांपूर्वी आंबेठाणच्या उत्तरेला असणाऱ्या गाव तळ्याच्या कडेने आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागून हा नवीन रस्ता तयार करण्याचे योजले होते. आंबेठाण गावाच्या पूर्वेपासून चाकण-वांद्रा रस्त्यापासून हा रस्ता निघून गावाच्या उत्तरेला असणाऱ्या बोरदरा रस्त्यापर्यंत आणून पुन्हा चाकण वांद्रा रस्त्याला हा बाह्यवळण रस्ता जोडणे असे या कामाचे स्वरूप होते. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने निधी मंजूर करून काम सुद्धा सुरु झाले होते. परंतु, काम सुरु असताना गावातील काही नागरिकांनी आपली जागा या रस्त्यात जाते म्हणून काम बंद पाडले होते. त्यानंतर पुन्हा त्यातून मार्ग काढून रस्ता अजून थोडा वळवून व संबंधित तक्रारदारांची तक्रार निवारण झाल्यानंतर रस्त्याचे काम सुरु करण्यात आले होते. त्यानंतर या कामाच्या ठिकाणी एक मोरीही बांधण्यात आली. पण पुन्हा तळ्याजवळ जागामालकाने हरकत घेऊन काम बंद पाडले होते. तेव्हापासून आजपर्यंत हे काम बंद होते.
आता या रस्त्यासाठी आवश्यक असणारी जागा खरेदी जवळपास पूर्ण झाली असून कुलकर्णी परिवाराची ८६१ चौ. मीटर, सोनवणे परिवाराची ४५ चौ. मीटर अशी जागा खरेदी करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यास निधी उपलब्ध करून दिला आहे.
वाहतूक कोंडीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी एकत्रित प्रयत्न केले आहेत. या परिसरात दिवसागणिक औद्योगिकीकरण वाढत आहे. त्यामुळे या भागात कंटेनर आणि तत्सम अवजड आणि मोठमोठी वाहने येण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच या गावठाण भागात दोन ठिकाणी ९० अंश असणारी वळणे आहेत. त्यामुळे वाहने वळताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याशिवाय या मार्गावरून चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोन, भामा आसखेड धरण आणि प्रस्तावित पाचवा टप्पा याकडे हा रस्ता जात असल्याने वाहनांची वर्दळ असते.

रस्त्यासाठी दोन कोटी निधी मंजूर केला असून जागा संपादनासाठी मालकांना चालू बाजारभावाप्रमाणे पेमेंट केले आहे. आता या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे. हा रस्ता मार्गी लागल्याने चाकण भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
-दिलीप मोहिते पाटील, आमदार, खेड

रस्त्यासाठी दोन जागा खरेदी करण्यात आल्या असून आता फक्त दवणे परिवाराची २२६ चौ. मीटर जागा खरेदी बाकी असून त्याचा निवाडा झाला आहे. जागा संपादनासाठी १ कोटी १७ लाख निधी मंजूर करण्यात आला असून नवीन रस्त्यासाठी जवळपास २ कोटी निधी मंजूर आहे. या निधीतून २०० मीटर लांब आणि १० मीटर रुंद रस्ता केला जाणार असून त्यात एक ठिकाणी मोठ्या मोरीचा समावेश आहे.
-संतोष पवार, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com