
डिंगोरेच्या सरपंच, उपसरपंचांचा अनोखा आदर्श
ओतूर, ता. २२ ः डिंगोरे (ता. जुन्नर) येथील सरपंच व उपसरपंचांनी स्वतःचे तेरा महिन्याचे मानधन गावच्या विकासासाठी देवून इतर गावातील सरपंच व उपसरपंच यांच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे. मागील वर्षी डिंगोरेच्या सरपंचपदी सीमा रमेश सोनवणे यांची तर उपसरपंचपदी नीलेश शिवाजी लोहोटे यांची बहुमताने निवड झाली होती. त्यावेळी सरपंच दांपत्याने सर्व सदस्यां पुढे जाहीर केले होते की, सरपंचपदी मिळणारे मानधन आम्ही गावच्या विकासासाठी देणगी म्हणून देणार आहोत. सरपंच व त्यांचे पती यांच्या या स्तुत्य निर्णयाचा आदर्श घेऊन उपसरपंच नीलेश लोहोटे यांनी सुद्धा आपले मानधन न स्वीकारता ते गावच्या विकासासाठी देण्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार नुकत्याच झालेल्या ग्रामविकास मंडळाच्या वार्षिक सभेमध्ये सोनावणे दाम्पत्याने सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत १३ महिन्यांच्या मानधनाची ३९ हजार रुपये ही रक्कम व उपसरपंच नीलेश लोहोटे यांनी १४ हजार ३०० ही रक्कम गावच्या विकासासाठी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विष्णू शेरकर यांच्याकडे जमा केली.
सरपंच उपसरपंचांनी गावच्या विकासासाठी आपले मानधन दिल्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबन तांबे, मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष सुनील आमले, विघ्नहर कारखान्याचे संचालक रघुनाथ लोहोटे, सोसायटीचे अध्यक्ष जालंदर उकिर्डे, उपाध्यक्ष एकनाथ शिंगोटे, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य विश्वास आमले, तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेश सुकाळे, माजी अध्यक्ष अहीलू लोहोटे, तान्हाजी लोहोटे, उद्योजक योगेश आमले, अंकुश थापेकर, मनोहर लोहोटे, दत्तात्रेय लोहोटे, राजेंद्र उकिर्डे, संदीप शिंगोटे आदी मान्यवरांनी कौतुक केले.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..