विजयस्तंभ अभिवादनासाठी लोटला जनसागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजयस्तंभ अभिवादनासाठी लोटला जनसागर
विजयस्तंभ अभिवादनासाठी लोटला जनसागर

विजयस्तंभ अभिवादनासाठी लोटला जनसागर

sakal_logo
By

कोरेगाव भीमा, ता. १ : कोरेगाव भीमानजीक पेरणेफाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभास २०४ व्या शौर्यदिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी देशभरातून विविध मान्यवरांसह आलेल्या आंबेडकरी बांधवांचा मोठा जनसागर उसळला होता. गर्दीने नगर रस्ता अक्षरश: फुलून गेला होता. दुपारी विजयस्तंभावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीही करण्यात आली. विविध पक्ष, संघटनांनी रॅलीने येत विजयस्तंभास मानवंदना दिली.
या कार्यक्रमाच्या नियोजनाची मुख्य जबाबदारी असलेल्या सामाजिक न्याय विभाग, बार्टी व शासनाच्या विविध विभागांनी स्थानिक ग्रामपंचायतींच्या सहयोगाने सुरेख नियोजन केले. हा कार्यक्रम शांततेने संपन्न करण्यासाठी प्रामुख्याने पोलिस दलानेही चोख बंदोबस्त ठेवत मोठी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. दिवसभर विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकारी, अधिकारी अनेक मान्यवरांनी येथे येत विजयस्तंभास मानवंदना दिली.
प्रमुख मान्यवरात उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, तसेच दलित कोब्राचे अ‍ॅड. भाई विवेक चव्हाण, बहुजन समाज पार्टी, भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघाचे सर्जेराव वाघमारे व पदाधिकारी, रिपब्लिकन सेनेचे विवेक बनसोडे, युवराज बनसोडे, पेरणे येथील सरपंच रूपेश ठोंबरे आदींसह विविध संस्था व पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. खासदार डॉ. अमोल कोल्हे, अमर साबळे, आमदार अशोक पवार, माजी आमदार बापू पठारे, गौतम चाबुकस्वार, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, आदींसह अनेक संस्थांचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी भेटी देवून विजयस्तंभास मानवंदना दिली.
यावर्षी सामाजिक न्याय विभाग व जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने स्तंभाची अभिवादन कार्यक्रमाचे सुविधांसह सुरेख नियोजन केले होते. रात्रीपासूनच बुद्धवंदनेने सुरवात झाली. सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. तसेच, पेरणे ग्रामपंचायतीसह कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहभाग घेतला.

दुपारी वाढली गर्दी
कोरोनामुळे विजयस्तंभ परिसरात सभा, संमेलने, मेळावे, पुस्तक प्रदर्शनास निर्बंध असल्याने सकाळी नगररस्त्यांवर पोलिस तसेच विविध पक्ष, संघटना पदाधिकाऱ्यांची वाहनेच दिसत होती. मात्र, दुपारनंतर अभिवादनासाठी मोठी गर्दी वाढली. सायंकाळी उशिरापर्यंत अभिवादनासाठी दोन्ही बाजूंनी अनेक बांधव येतच होते. कोरोनाच्या पार्श्वमीवर लहान मुले व ज्येष्ठांनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन प्रशासनाने करून दूरदर्शन व समाज माध्यमांवर कार्यक्रमाचे थेट प्रसारणही केले होते. मात्र, तरीही गर्दीने स्तंभपरिसर व नगर रस्ता गर्दीने फुलला होता.

प्रशासनाचे चोख नियोजन
अभिवादनदिनानिमित्त जयस्तंभास केलेली आकर्षक सजावट व रोषणाई, स्क्रीन व्यवस्था, तसेच मानवंदनेसाठी आलेल्यांचे नियोजन करण्यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाने विजयस्तंभस्थळी केलेली अंतर्गत व्यवस्था, तसेच आत व बाहेर जाण्यासाठीही तिहेरी व्यवस्था केली होती. या सुविधांसाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी, जिल्हा शिरूर-हवेलीचे प्रांताधिकारी, तसेच विविध विभागाचे अधिकारी जातीने लक्ष ठेवून होते. तर, बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिस महानिरीक्षकांसह पोलिस आयुक्त व जिल्हा पोलिस अधिक्षकांसह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी जातीने बारकाईने लक्ष ठेवून होते.

पोलिस प्रशासनाची करडी नजर
विजयस्तंभ मानवंदनेसाठी मोठा जनसागर उसळलेला असताना हा कार्यक्रम शांततेत पार पडावा, यासाठी या परिसरातील प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष होते. त्यासाठी अतिरिक्त पोलिस महानिरीक्षकासह पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारीही गेल्या अनेक दिवसापासून या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत होते. आजही हे सर्वजण आपल्या अधिकाऱ्यांसह स्वतः जातीने अभिवादनस्थळी पोलिस बंदोबस्त,
सर्व सुविधा व प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन होते. दुपारनंतर नागरिकांची गर्दी वाढली, मात्र अभिवादनासाठी येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींना विशेष मार्ग व नागरिकांसाठी मुख्य मार्ग व पोलिसांसाठीही राखीव येण्याजाण्याचे मार्ग ठेवल्याने अभिवादनस्थळी फारसा गोंधळ झाला नाही.

नागरिकांच्या मदतीला नियंत्रण कक्ष
अभिवादन स्थळाच्या बाजूलाच पोलिसांनी नियंत्रण व मदत कक्ष उभारला होता. ध्वनी क्षेपकावरून गर्दी नियोजनाच्या सूचना देत असताना सोबतच्या व्यक्ती, मुले, साहित्य हरवल्याच्या घोषणाही या कक्षातून दिल्या जात होत्या. त्यामुळे ताटातूट झालेल्या अनेकांची भेटीही झाल्या. तसेच, अनेकांना आपल्या वस्तूही मिळाल्या. तसेच, तक्रारीचे निवारणही झाले. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला.

स्वयंसेवकांचीही मदत
अभिवादन स्थळावर येणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन तसेच वाहतूक नियमन करण्यासाठी पोलिसांना स्थानिक तरुण स्वयंसेवकांचीही मदत झाली. शांतिदूताच्या भूमिकेतील हे तरुण उत्साहाने जागोजागी लोकांशी संवाद साधत मदत करीत होते.

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही अभिवादन केले. याबरोबरच सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या वतीने सुरेख नियोजन करून आंबेडकरी अनुयायांना विविध शासकीय योजनांची माहिती व लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती असणारी पुस्तक वाटपही करण्यात आले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top