
जुन्नरमध्ये खिलार बैलांना पसंती-JUN21B0293
जुन्नर, ता.२२ : बेल्हे (ता.जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारात सुमारे ७० टक्के खिलार जातीचे बैलांची आवक झाली. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठल्यानंतर खिलार बैलांना ग्राहकांची पसंती मिळाल्याची माहिती सचिव रूपेश कवडे यांनी दिली. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर प्रथमच बैल बाजारात एकूण ३८२ बैल विक्रीसाठी आले होते. यापैकी २७५ बैलांची विक्री झाली.
बैलांना सरासरी किंमत १२ ते २५ हजार रुपयांपर्यंत किंमत मिळाली.यात खिलार जातीचे बैल अधिक होते. बैल बाजारात सुमारे सात ते आठ वर्षांनंतर खरेदीदारांची गर्दी होती. येथील सर्वात मोठ्या बैल बाजारात बैलांना मागणी वाढलेली दिसून आली. खिलार जातीच्या बैलांच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या असल्याचे कवडे यांनी सांगितले.
राज्यातील बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदी उठवल्यानंतर शेतकरी आणि बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींचे मोठे अर्थकारण असते. बंदी उठवल्यानंतर या अर्थकारणाला चांगले दिवस आल्याचे पहावयास मिळत आहे.
बेल्हा येथे भरणारा बैलबाजार सर्वात मोठा बैलबाजार म्हणून ओळखला जातो. गावठी, खिलार, भडुशी, जर्सी असे विविध जातीचे बैल या बाजारात विकण्यासाठी येत असतात. कोरोनामुळे हा बाजार गेली दोन वर्ष बंद होता.
न्यायालयाच्या निकालामुळे किमती वाढणार
सर्वसाधारण बैलांना या बाजारात किमान ३० ते ६० हजारांपर्यंतचा भाव मिळतो. बैलाचा रंग, शिंगं, वाशिंग, दात आणि उंची यावरुन प्रत्येक बैलाची किंमत ठरते. कोरोनामुळे हा बाजार गेली दोन वर्ष बंद होता. ज्यामुळे मालकांची उलाढालही कमी झाली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे. बैलगाडा शर्यती बंद झाल्या नंतर शर्यतीच्या बैलांची किमती कमी झाल्या होत्या त्या आता पुन्हा वाढतील असे चित्र आहे.