महाराष्ट्राचा चित्ररथ संवर्धनासाठी जुन्नरला मिळावा

महाराष्ट्राचा चित्ररथ संवर्धनासाठी जुन्नरला मिळावा

जुन्नर, ता. १२ : दिल्ली येथे राजपथावर प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या वतीने सादर करण्यात येणारा ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ हा चित्ररथ सादरीकरणानंतर संवर्धनासाठी जुन्नर शहराला मिळावा, अशी मागणी जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
याबाबत संस्थेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या संकल्पनेवरील चित्ररथाद्वारे महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले शेकरू, महाराष्ट्राचे फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन, पक्षी हरियाल यांच्यासह राज्यातील जैवविविधतेची माहिती देशासह जगभरात पोचणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जैवविविधता संवर्धनासाठीच्या जनजागृतीसह चालना आणि प्रोत्साहन मिळणार आहे. शेकरूचा प्रमुख अधिवास हा भीमाशंकर आणि जुन्नर तालुक्याच्या पश्‍चिम घाट परिसरात आहे. ब्ल्यू मॉरमॉन या दुर्मिळ फुलपाखराचा अधिवासदेखील याच परिसरात आहे. हा परिसर आमच्या आणि आपल्या कार्यक्षेत्रातील असल्याने आम्हाला याचा अभिमान आहे आणि आम्ही याबाबत संवेदनशिल आहोत. जुन्नर तालुक्याला राज्य सरकारने पर्यटन तालुक्याचा दर्जा दिला असून, शासनाच्या विविध विभागांच्या वतीने पर्यटनवृद्धीसाठी विविध उपाययोजना आणि विकासकामे सुरु आहेत. जुन्नर तालुक्यात येणाऱ्या निसर्गप्रेमी पर्यटकांना प्रजासत्ताक दिनाचा राजपथावरील चित्ररथ कायमस्वरूपी पाहता यावा आणि याद्वारे एक नवीन आकर्षण केंद्र जुन्नर शहरात व्हावे, यासाठी हा चित्ररथ जुन्नर शहराला मिळावा.
दरम्यान, याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दीपक हरणे यांच्यासह जुन्नर नगरपरिषदेच्या जिजामाता उद्यानात चित्ररथ कायमस्वरूपी संवर्धित करण्याबाबतचे पत्र नगरपरिषदेचे प्रशासक आणि प्रातांधिकारी सांरग कोडलकर, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना दिले आहे.


‘सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने केलेल्या मागणीनुसार जैवविविधता मानके चित्ररथ जुन्नर शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र व्हावा, यासाठीचा सकारात्मक प्रस्ताव आम्ही आमच्या कार्यालयाद्वारे शासनाकडे पाठवणार आहे.
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक,
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, पुणे

यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचा महाराष्ट्राचा चित्ररथ राज्यातील पहिल्या पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर शहराला आकर्षण केंद्र म्हणून मिळावा, या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या मागणीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा सूचना आमच्या कार्यालयाला दिल्या आहेत.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com