जिल्हा बॅंकेसाठी चुरशीने मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बॅंकेसाठी चुरशीने मतदान
जिल्हा बॅंकेसाठी चुरशीने मतदान

जिल्हा बॅंकेसाठी चुरशीने मतदान

sakal_logo
By

शिरूर, ता. २ ः विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर, पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणूक मतदानाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाचे नेते - कार्यकर्ते रविवारी (ता. २) एकमेकांसमोर उभे ठाकले. ॲड. अशोक पवार व बाबूराव पाचर्णे या आजी - माजी आमदारांसह तालुक्‍यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मतदान संपेपर्यंत मतदान केंद्रावर ठाण मांडल्याने निवडणुकीत रंगत भरली. मतदानानंतर दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे करण्यात आले आहेत.

जिल्हा बॅंक संचालकपदासाठी ‘अ’ वर्ग मतदार संघातून, शिरूर तालुक्‍यातून आमदार ॲड. अशोक पवार यांच्यासमोर आबासाहेब गव्हाणे हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस कार्यकर्ते भाजपसह विरोधकांच्या पाठिंब्यावर उभे ठाकले आहेत. शिरूर तालुक्‍यात एकूण १३२ मतदार असून, एका मतदाराचा ठराव वेळेत न गेल्याने प्रत्यक्षात १३१ मतदार होते. त्या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला.

राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार ॲड. पवार हे पत्नी, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शिरूर तालुकाध्यक्ष रवीबापू काळे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पूर्णवेळ मतदान केंद्रावर उपस्थित होते. गव्हाणे यांच्या पाठीशी ताकद उभी केलेले माजी आमदार बाबूराव पाचर्णे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंगअण्णा थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, संजय पाचंगे, जयेश शिंदे आदी ठाण मांडून बसले होते. अ वर्ग मतदारसंघातील मतदानाबरोबरच; क व ड वर्ग मतदार संघाचे मतदानही उत्साहात झाले. ड वर्गातून दादा पाटील फराटे हे भाजपकडून रिंगणात असून, ते दिवसभर मतदान केंद्रावर थांबून होते.

जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नेहमीच शेतकरी हिताची भूमिका घेऊन शेतकरी कल्याणाच्या योजना राबविल्या आहेत. या नेत्यांमुळेच जिल्हा बॅंक प्रगतिपथावर आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या पॅनेलच्या पाठीशी मतदार राहतील, याबद्दल तिळमात्र शंका नाही.
-ॲड. अशोक पवार,
आमदार व निवडणुकीतील उमेदवार

जिल्हा बॅंक निवडणुकीत मी ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो किंवा पाठिंबा देतो, त्याचा विजय होतो, हे गेल्या सलग अनेक निवडणुकांत दिसून आले आहे. हा योगायोग समजा अथवा मतदारांचा भक्कम पाठिंबा समजा, पण ही वस्तुस्थिती आहे. या निवडणुकीतही याच योगायोगाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येईल. -बाबूराव पाचर्णे, माजी आमदार, शिरूर

भपकेबाज प्रचारापेक्षा मी प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. या निवडणुकीच्या मतदारांत सन्नाटा जाणवला. ‘बोलेगा तो कान काटेगा’ अशी धास्ती बाळगलेल्या मतदारांनी सुप्त पसंतीचे माप माझ्याच पदरात टाकले आहे. त्यामुळे विजयाबाबत मला आत्मविश्‍वास आहे.
-आबासाहेब गव्हाणे,
निवडणुकीतील अपक्ष उमेदवार


शिरूर व आंबेगाव तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कुठलीही गटबाजी नसून पक्ष एकसंध आहे. नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चांगला समन्वय आहे. त्याचीच प्रचिती जिल्हा बॅंक निवडणुकीतील मतदानावरून व आमदार अशोक पवार यांच्या एकतर्फी विजयातून दिसून येईल.
-मानसिंग पाचुंदकर,
अध्यक्ष, शिरूर - आंबेगाव मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस.

PNE22S32516

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top