पोस्टरबाजांवर एकही गुन्हा दाखल नाही

पोस्टरबाजांवर एकही गुन्हा दाखल नाही

बारामती, ता. ४ : शहर विद्रूपीकरण करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचा पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांनी दिलेला इशारा कागदावरचाच ठरला. एक महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही सर्रास शहरात पोस्टरबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी एकही गुन्हा दाखल केला नाही.

बारामतीचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाडीक यांनी शहर विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. शहरातील कोणतीही भिंत, महावितरणचे डीपी, पथदिव्यांचे खांब, उद्योग भवनांच्या भिंती किंवा कोणत्याही सार्वजनिक जागेवर नगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय पोस्टर चिटकविणे, फ्लेक्स लावणे, यासह शहर विद्रूप होईल अशा कृतीविरोधात कारवाईचा इशारा देण्यात आला होता.
नागरिकांनी अपार्टमेंटचे पार्किंग, उद्योगभवनांच्या भिंती, महावितरणचे बॉक्स, खांब यासह अनेक मोक्याच्या जागी जाहिराती चिटकविल्या. प्रत्येक जाहिरातीमध्ये ज्यांची जाहिरात आहे, त्यांचे मोबाईल क्रमांकही नमूद केलेले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांकडून अनेकदा नाराजी व्यक्त
शहरात हजारोंनी अशी पोस्टर्स आणि जाहिराती चिटकवून ठेवलेल्या आहेत. ना नगरपालिका ना पोलिस या बाबत कोणीही कारवाई केली नाही. विद्रुपीकरणाबाबत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अनेकदा नाराजी व्यक्त केली, असे असतानाही विद्रुपीकरणाबाबत कारवाई होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

शहराच्या भिंती जाहिरातींमुळे खराब
शहरातील नगरपालिकेची उद्योग भवने तसेच सार्वजनिक ठिकाणी जाहिराती चिटकवून भिंती खराब करून टाकल्या आहेत. अनेकदा रंगरंगोटी केल्यानंतरही पुन्हा नव्याने जाहिराती चिटकविण्याचा कार्यक्रम केला जातो. काही ठिकाणी मुले मुली कामाला लावून शहरभर जाहिराती लावल्या जातात. नगरपालिकेची परवानगी घ्यायची असते, त्या साठी काही कर भरावा लागतो ही बाब अनेकजण विसरुन गेल्याची स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com