या ....बारामती तुमचीच आहे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

या ....बारामती तुमचीच आहे...
या ....बारामती तुमचीच आहे...

या ....बारामती तुमचीच आहे...

sakal_logo
By

बारामतीच्या विकासात
‘समूहाचे कल्याण’

कृषी, सहकार, दुग्ध व्यवसाय, साखर कारखानदारी, शिक्षण, सांस्कृतिक, वैद्यकीय, क्रीडा, उद्योग, महिला सक्षमीकरण अशा असंख्य विषयात केवळ राज्यातच नाही; तर देशात आदर्श ठरेल, असे शहर म्हणून बारामतीचा नामोल्लेख करता येईल. नागरीकरण होतानाही गावाचे गावपण जपले जाईल व सर्व सुखसुविधा येथे राहणाऱ्या नागरिकांना मिळतील, याची काळजी येथे घेतली गेली. लोकांनीही त्याला भरभरून साथ दिली आणि बारामती जगाच्या नकाशावर जाऊन पोहोचली.

- मिलिंद संगई, बारामती

‘सर्वांगिण विकास’ असा शब्द प्रत्यक्ष अनुभवायचा असेल; तर बारामतीला जरूर भेट द्यायला हवी. जुन्या बारामतीच्या खुणा आता पुसट झाल्या असून, आता आधुनिकतेचे साज या शहरावर चढलेले दिसतात. कृषीपासून ते शिक्षणापर्यंत आणि उद्योगांपासून ते वैद्यकीय सुविधांपर्यंत अनेकविध बदल या शहरात गेल्या काही दशकांमध्ये झाले, त्या बदलांमुळे एक संपन्न शहर म्हणून बारामतीची ओळख निर्माण झाली. ‘बारामती पॅटर्न’ची जेव्हा चर्चा होते, तेव्हा इतर विकासासोबतच या पंचक्रोशीतील प्रत्येक कुटुंब हे सशक्त कसे होईल, त्यांचे उत्पन्न वृद्धींगत होईल व विकासाची फळे सर्वांनाच कशी व्यवस्थित चाखता येतील, यावर येथे भर राहिला. सार्वजनिक स्वरूपाच्या कामांना सातत्याने प्राधान्य दिले गेले. ‘समूहाचे कल्याण’ ही संकल्पना येथे अंगीकारली आहे.
राजकीय इच्छाशक्ती असेल; तर परिवर्तन होते, परिसराचा कायापालट होतो, अर्थकारण सुधारते आणि लोकांच्या राहणीमानातही बदल घडतो. व्यापक दूरदृष्टी असलेले, विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व लाभल्यानंतर परिवर्तन कसे घडते, हे बारामतीत अनुभवता येते. सन १९६७ मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार हे सर्वप्रथम आमदार झाले, तेव्हापासून सुरु झालेले परिवर्तनाचे पर्व आजही कायमच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यशैलीने या शहराच्या विकासाचा धडाका लावला. शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणात गेल्यानंतर अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणाची सूत्रे हाती घेतली. सुप्रिया सुळे याही खासदार म्हणून निवडून आल्या आणि या दोघांनी राज्य व राष्ट्रीय असा समन्वय साधत बारामतीचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न केले. शेती व शिक्षणाच्या सुविधांवर भर देत या दोन गोष्टींमुळे येथील परिस्थितीत आमूलाग्र बदल होईल, या दृष्टीने रचना करण्यात आली. कृषी विकास प्रतिष्ठान, विद्या प्रतिष्ठान, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयासह माळेगाव, सोमेश्वर व छत्रपती सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून विविध नवीन गोष्टी बारामतीत साकारण्यास प्रारंभ झाला.

शेतकऱ्यांसाठी परिपूर्ण मार्गदर्शन
शेतीला योग्य दिशा देणे, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करणे, दुसरीकडे नव्या पिढीला शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, या दोन महत्त्वाच्या मुद्यांवर बारामतीत काम सुरु केले आणि आज अनेक वर्षानंतर त्याचे दृश्य परिणाम समोर येऊ लागले आहेत. ग्रामीण अर्थकारणाला गती द्यायची असेल; तर शेती व शेतीपूरक व्यवसायांचे मजबुतीकरण करणे व कुटुंबातील प्रत्येकाला उच्च शिक्षणाची संधी बारामतीतच उपलब्ध करून देणे, यावर भर दिला गेला. स्व. अप्पासाहेब पवार यांनी कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आधुनिक शेतीचे तंत्र शेतकऱ्यांना समजून सांगण्यासोबतच मुलींच्या शिक्षणासाठी शारदानगर शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. या संस्थेचे बारामतीच्या सर्वांगिण विकासातील योगदान अनन्यसाधारण असेच आहे. त्यांच्या पश्चात राजेंद्र पवार व सुनंदा पवार यांनी त्यांच्या कामाला अधिक गती देत हे काम पुढे सुरु ठेवले आहे.

आधुनिक शेतीला प्रोत्साहन
कृषी महाविद्यालय असेल किंवा कृषी विज्ञान केंद्र असेल... त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती कशी करावी, याची माहिती पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मिळू लागली. नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करताना नवीन प्रजाती व आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले. आता तर आर्टिफिशिअल इंटेलिजेन्ससह संशोधनाचे केंद्रही बारामतीत सुरु झाले आहे. इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटरच्या मदतीने बारामतीत स्थानिक युवकही संशोधन
करू शकतील. दुग्ध व्यवसाय अधिक उत्तम कसा होईल, यासाठी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने संशोधन व इतर उपक्रम डेअरी फार्मच्या वतीने राबविले जात आहेत. आज ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, इनक्युबेशन व इनोव्हेशन सेंटर या माध्यमातून शेतीबाबत परिपूर्ण माहिती देणे, कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देण्यासह नव्याने संशोधनही होऊ लागले आहे.

शेतीला उद्योगाची जोड
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुधाच्या व्यवसायाला जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले गेले, त्यासोबतच कुकुटपालन, शेळी-मेंढीपालन, रेशीम व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न केला गेला. दुसरीकडे युवकांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने बारामतीत सुरवातीला बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीची व त्यानंतर बारामती एमआयडीसीची स्थापना केली गेली. या माध्यमातून नवीन उद्योग सुरु होतील, स्थानिक युवक उद्योजक बनतील व काही युवकांच्या हाताला काम मिळेल, असा या मागचा हेतू होता. त्यामुळे बारामतीच्या औद्योगिक विकासाला चालना मिळाली, उद्योजकता वाढीस लागली, नव्याने काही लघुउद्योग सुरु झाले व अनेक युवक व्यावसायिक बनले. काहींनी पूरक व्यवसाय सुरु केले. डायनामिक्स डेअरीसारखा दुधावर प्रक्रीया करणारा प्रकल्प बारामतीत उभारला, पियाजिओसारखा वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपनी आली, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क उभारली गेली. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. एकीकडे महिलांच्या शिक्षणाच्या सक्षमीकरणावर भर दिला गेला; तर दुसरीकडे हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून साडेतीन हजारांवर महिलांच्या हाताला थेट काम मिळाले असून, महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत. ही कुटुंबे या आर्थिक स्थैर्यामुळे सक्षम बनली आहेत. आज बारामतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही सर्वच क्षेत्रात धडाडीने काम करताना दिसतात, हे एक सामाजिक परिवर्तन असून, त्याचा दूरगामी परिणाम कौटुंबिक आर्थिक स्वास्थ्य अधिक मजबूत होण्यात झाला आहे.

‘मुलगी शिकली, प्रगती झाली’
विद्या प्रतिष्ठान, शारदानगर, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ यासह इतरही शैक्षणिक संस्थातून मुली शिकू लागल्या आणि घराच्या अर्थकारणाची दिशाही बदलू लागली. अनेक कुटुंबातील महिलांची पहिलीच पिढी शाळा महाविद्यालयात गेल्याची उदाहरणे होती. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ असे वाक्य अनेकदा कानावर पडते, पण बारामतीत त्याची शेकडो उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. केवळ बारामतीच नाही; तर जगाच्या कानाकोपऱ्यात आज बारामतीत शिकून मोठ्या झालेल्या मुली विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या दिसतात.

गावाचे गावपण हरवू न देता विकास
बारामतीबद्दल या पूर्वीही अनेकदा लिहील आणि बोललं गेले आहे. बारामती बदलते आहे, हे निर्विवाद आहे, विकासाच्या खुणा राज्यातील अनेकांना खुणावत असल्याने एक संपन्न शहर म्हणून आता बारामतीकडे पाहिले जात आहे. तालुक्याचे ठिकाण असले; तरी जिल्ह्याच्या तोडीच्या सुविधा बारामतीत निर्माण केल्या आहेत. प्रशासकीय सुविधांसोबतच बारामतीत शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, सहकार, कृषी अशा अनेक बाबतीत उत्तम बाबी आहेत. स्थायिक होण्यासाठी एखाद्या गावाचा जेव्हा लोक विचार करतात, त्यासाठी बारामतीला पहिले स्थान दिले जाते. स्वच्छता, आरोग्य, मूलभूत सुविधा, सुंदर वातावरण अशा अनेक आघाड्यांवर बारामती अग्रेसर आहे. येथे आगामी काही वर्षांचा विचार करून एक विकासाचे व्हीजन नजरेसमोर ठेवून काही बाबी हाती घेतल्या आहेत. काळ बदलतो, तशी अनेक गणितेही बदलतात, झपाट्याने नागरीकरण होत आहेत, लोकसंख्येचा ताणही वाढत आहे, अशा स्थितीत गावाचे गावपण हरवू न देता विकास साध्य करण्याचा प्रयत्न केले जात आहेत.

सहकारी संस्थाही कार्पोरेट दर्जाच्या
बारामतीत एकीकडे औद्योगिक विकास साधतानाच सहकारालाही कमालीचे महत्व दिले आहे. बारामती तालुका दूध संघ, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती सहकारी बँक या सारख्या संस्थांच्या माध्यमातून आणि बारामतीत पंचक्रोशीतील माळेगाव, छत्रपती व सोमेश्वर कारखान्यांच्या मदतीने शेतकरी व परिसरातील लोकांचे अर्थकारण बदलले. शेतकऱ्यांना सभासद करून या संस्था मजबूत करण्यासाठी लक्ष घातले गेले, त्यांच्या कारभाराला दिशा दिली, काळाप्रमाणे त्यांना बदलायला सांगितले आणि आज या संस्था उत्तमपणे कारभार करीत आहेत. बारामतीतील सर्वच सहकारी संस्थांचे कामकाज एखाद्या कार्पोरेट कंपनीप्रमाणे सुरु आहे.

सुशोभीकरणाला प्राधान्य
बारामती शहरातील नीरा डावा कालवा सुशोभिकरणाचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. दुसरीकडे कऱ्हा नदीच्या सुशोभिकरणासह मजबुतीकरण करण्याची धडपड सुरु आहे. बृहत् बारामती पाणी पुरवठा योजनेच्या कामाने गती घेतली असून, बारामतीकरांना आगामी काळात सात दिवस चोवीस तास पिण्याचे पाणी देण्याचे स्वप्न आहे. साठवण तलावांची क्षमता वाढविण्यासह पाण्याच्या टाक्यांची संख्या वाढवून जलवाहिन्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न झाला आहे. शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रिंगरोडसह बाह्यवळण रस्त्यांची निर्मिती सुरु आहे. बारामती-पुणे हे अंतर कमी कसे करता येईल व वेगाने पुण्यापर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम रस्त्यांची निर्मिती केली आहे.

मेडीकल हब
शहराचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी ५०० खाटांच्या क्षमतेचे शासकीय रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले आहे. त्याचा थेट फायदा तीन-चार जिल्ह्यातील गरजूंना होईल. शासकीय दरात आरोग्याची सुविधा मिळणे, ही बाब या शहरासाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाची ठरली आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयासही मान्यता मिळाली असून, लवकरच तेही काम सुरु होणार आहे. त्या सोबतच रुई व सुपे रुग्णालयाची क्षमताही आता प्रत्येकी १०० खाटांची होईल. कोविडसारख्या संकटाला सामोरे जाताना सर्वांना उपचार मिळावेत, असा या मागचा प्रयत्न आहे.

सर्वच शिक्षणाची गंगा
बारामतीत विधी, संगणक, अभियांत्रिकीपासून ते वैद्यकीय आणि विमान प्रशिक्षणापासून कृषीपर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजनापासून ते परिपूर्ण शिक्षणासाठीच्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. मुलींसाठीही शिक्षणाच्या बाबतीत एक सुरक्षित शहर म्हणून बारामतीचा उल्लेख केला जातो. बारामती एज्युकेशन हब म्हणून पुढे आल्यामुळे पूरक व्यवसायालाही चालना मिळाली आणि त्याचा अर्थकारणावरही सकारात्मक परिणाम झाला आहे. अनेक नवीन व्यवसायाला शिक्षणाच्या सुविधांमुळे नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. बारामतीत कृषी विषयक शिक्षणाचेही दालन उपलब्ध असून, आता तर संशोधनाचीही संधी मिळू लागली आहे. एखाद्या शहरात जे शिक्षण सहजतेने मिळते, त्याच दर्जाचे शिक्षण बारामतीत आज मिळू लागले आहे, ही या शहराची एक जमेची बाजू आहे.

खेळाडूंना प्रोत्साहन
बारामतीत कबड्डी, खो-खो, कुस्ती, क्रिकेटसह सर्वच खेळांना व बारामतीतील खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन दिले गेले. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर परदेशातून टर्फ मागवून येथील क्रीडांगण सर्वोत्तम करून दिले आहे. बारामतीत हे स्टेडीयम व्यवस्थित झाल्याने रणजीसह दुलिप करंडकाचेही काही सामने बारामतीत झाले. क्रीडा क्षेत्रात ग्रामीण भागात कोणालाही काहीही अडचण आली, तर ती लगेच दूर केली जाते. येथील अनेक खेळाडूंना खेळासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. बारामतीत कबड्डी व खो-खोच्या राष्ट्रीय स्पर्धा झाल्या ‘महाराष्ट्र केसरी’ची स्पर्धा बारामतीत झाली. सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या स्नेहसंबंधातून बारामतीचा दौरा केला. मेडीकल आणि एज्युकेशन हबसोबतच आता बारामती स्पोर्ट्स हब म्हणूनही हळूहळू विकसित होत आहे. जिल्हा क्रीडा संकुलासोबतच बारामतीत सर्व प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. बॅडमिंटन, लॉन टेनिस, क्रिकेट, फूटबॉलसह मैदानी खेळांना अधिक गती देण्याचा प्रयत्न बारामतीत होत आहे. बारामतीतून खेळाडू घडावेत, ग्रामीण मुलांनाही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी, या उद्देशाने क्रीडा सुविधा बारामतीत जाणीवपूर्वक दिल्या जात आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
येथे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते, नाट्यप्रयोग, गाण्यांचे कार्यक्रम, वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यानमाला, विविध महोत्सव, संमेलने मान्यवरांचे कार्यक्रम सातत्याने होतात. या शहरात सांस्कृतिक उंचीही मोठी आहे. बारामतीकर कलेला दाद देणारे खरे रसिक आहेत. या शहराचे एक वैशिष्ट्य आहे की, या शहरात जो आला, ज्याने आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, त्याला या शहराने आपलेसे करून घेतले. येथे येणाऱ्या प्रत्येकाला संधी मिळाली आणि तो बारामतीकर होऊन गेला.

पुणे-मुंबर्ईकरांकडून गुंतवणुकीस प्राधान्य
बारामतीत प्रत्येकाला त्याच्या बजेटच घर मिळते, हेही या शहराचे वैशिष्ट्य आहे. ज्यांना स्वमालकीची घरे घेणे शक्य नाही, त्यांच्यासाठीही अनेक सदनिका उपलब्ध आहेत. त्यामुळे बारामतीत राहण्याचीही गैरसोय होत नाही. बांधकाम क्षेत्रानेही बारामतीत कात टाकली असून, बारामतीत असंख्य नवीन प्रकल्प साकारत आहेत. वेगाने होणाऱ्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर घरांची गरज भासू लागली असल्याने प्रकल्पांनाही मागणी वाढू लागली आहे. घरांसोबतच व्यावसायिक प्रकल्पांनाही बारामतीत चांगली मागणी आहे. विकासाच्या वाटेवर हे शहर असल्याने येथे आगामी काळात प्रगतीची दालने खुली होणार आहेत, याची कल्पना असल्याने बारामतीत गुंतवणुकीस आता मुंबई व पुण्यातील लोकही प्राधान्य देऊ लागले आहेत. सोन्या-चांदीची, तसेच कपड्यांची एक मोठी बाजारपेठ म्हणूनही बारामतीचा नावलौकीक आहे. त्यामुळे त्याचाही एक चांगला परिणाम बारामतीतील गुंतवणुकीवर झाला आहे.

रस्ता, रेल्वे व हवाई मार्गाची कनेक्टिव्हिटी
बारामतीत आज ‘केजी टू पीजी’ शिक्षणाची दालने खुली आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकीपासून ते थेट वैमानिक प्रशिक्षणाची सोयही येथे आहे. इंटरनेटसह रस्ता, रेल्वे व हवाई मार्गाची कनेक्टिव्हिटी आहे. पालखी मार्गासह अनेक प्रमुख रस्त्यांना जोडणारे हे गाव आहे. बारामती-फलटण रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागल्यानंतर रेल्वेच्या नकाशावरील बारामती हे महत्त्वाचे जंक्शन होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील गाव असल्याने आता नव्या भव्य रस्त्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. अष्टविनायकांतील पहिला मोरगावचा मयुरेश्वर हा बारामती तालुक्यात आहे. त्यामुळे या परिसराचाही हळूहळू विकास सुरु झाला आहे. पुरंदर तालुक्यात जर विमानतळ झाला; तर बारामतीच्या दृष्टीने त्याचा मोठा फायदा होणार आहे.

विकासाच्या पॅटर्नची चर्चा
‘बारामतीसारखी देशात १०० शहरे तयार झाली, तर भारत खऱ्या अर्थाने विकसित होईल,’ असे गौरवोद्गार दिवंगत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काढले होते. बारामतीच्या विकासाच्या पॅटर्नची चर्चा झाली. बारामतीच्या विकासाचे जे व्हीजन निश्चित केले आहे, त्याची पाहणी व अभ्यास प्रत्येक आमदार व मंत्र्यांनी करणे गरजेचे आहे. विकासाभिमुख राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून बारामतीचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला गेला व विरोधकांनीही बारामतीची स्तुती करण्यात हयगय केली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
अटल इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटरची स्थापना बारामतीत करण्यात आली आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांसाठी कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न या केंद्राच्या माध्यमातून केला जात आहे.
बारामती येथील अटल इनक्युबेशन सेंटर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता, वेअरेबल कॉम्प्युटिंग आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी आधारित स्मार्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर संशोधन चालू आहे. याचा उपयोग कृषी आणि अन्न उद्योगातील विविध समस्यांवर उपाय म्हणून केला जाऊ शकतो.

ऑक्सफर्डशीही नाते जुळणार
तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठाने बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. बारामतीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा घटक आहे. या पुढील काळात गुगल, मायक्रोसॉफ्ट, इंटेलसारख्या आघाडीच्या कंपन्यांसोबतच ऑक्सफर्डच्या माध्यमातून ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे संशोधनही जगात पोहोचणार आहे. ट्रस्टच्या मदतीने ऑक्सफर्ड अशा पद्धतीचे कृषी विषयक प्रशिक्षण कार्यक्रम ऑक्सफर्डमध्ये राबविणार आहे.

‘या... बारामती तुमचीच आहे...’
सत्ताधारी असो विरोधक, युवक असो वा महिला...विद्यार्थी असो वा प्राध्यापक प्रत्येकाने आवर्जून एकदा बारामती निवांतपणे पाहायला यायलाच हवे. कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्याअगोदर एकदा शांतपणे बारामती व बारामतीकर एकदा अनुभवून मगच काही भाष्य करणे योग्य असेल. एखादे शहर किती वेगाने बदलू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून बारामतीचा उल्लेख करता येईल. शेवटी एकच म्हणावेसे वाटते, ‘या... बारामती तुमचीच आहे...’

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top