मराठी भाषेचा वारसा जतन करण्याची आवश्यकता ः कोळेकर
भिगवण, ता. ३१ : ‘‘मराठी भाषा ही बहुरंगी व बहुढंगी भाषा आहे. मराठी भाषेमध्ये माधुर्य, सौंदर्य व नेमका भाव व्यक्त करण्याची प्रचंड क्षमता आहे. अलीकडे परकीय भाषांच्या आक्रमणामुळे मराठी भाषेबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. मराठी भाषेला मोठा वसा आणि वारसा आहे हा वारसा कायद्याच्या धाकाने नव्हे तर मनापासून जपण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जेजुरी येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयातील प्रा. डॉ. अरुण कोळेकर यांनी केले.’’
येथील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित व्याख्यानामध्ये प्रा. डॉ. अरुण कोळेकर ‘मराठी भाषा वापराचे महत्त्व’ या विषयावर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज होते. यावेळी प्राचार्य डॉ. वाळुंज म्हणाले, ‘‘मराठी भाषेचा वापर आणि व्यक्तिमत्त्व विकास याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. चांगली भाषा कमवावी लागते. संवाद साधताना चांगली भाषा बोलता येणं हे चांगल्या व्यक्तिमत्वाचे निदर्शक मानले जाते. उत्तम मराठी भाषा जाणणाऱ्यांसाठी नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.’’
विद्यार्थी विकास मंडळ व मराठी विभाग यांच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक गोविंद काळे, रघुराज मेटकरी, गजानन लोंढे, अतुल चौरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. सुरेंद्र शिरसट यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.