
न्यायालयीन वाद असताना जागेचा अनधिकृतपणे ताबा
भोर, ता. १५ : न्यायालयीन वाद सुरू असताना अनधिकृतपणे जागेचा ताबा घेणाऱ्या १० महिलांसह १७ जणांविरुद्ध भोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गजानन नारायण वीर (रा. नऱ्हे, ता. भोर), नितीन सीताराम शिंदे (वंडरसीटी, पुणे), अक्षय रमेश येवले (रा. नऱ्हे, ता. हवेली) व अक्षय प्रकाश मांडे यांच्यासह इतर ४ ते ५ पुरुष आणि ८ ते १० महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अविनाश दत्तात्रेय पवार यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संबंधित जागेत आरोपींनी उभारलेली लोखंडी पत्र्यांची टपरी जप्त केली. याबाबत भोर पोलिसांनी माहिती दिली की, अविनाश पवार आणि गजानन वीर यांच्यामध्ये भोर शहरातील वेताळ पेठ परिसरातील सर्व्हे नंबर ५६ मधील जागेचा वाद सुरु आहे. पुण्यातील न्यायालयात याबाबात युक्तिवाद सुरु आहे. परंतु, या जागेवर आजपर्यंत अविनाश पवार व इतर पवार कुटुंबीयांची वहिवाट आहे. न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. तरीदेखील गजानन वीर, नितीन शिंदे व अक्षय मांडे यांनी इतर महिला व पुरुषांसमवेत मंगळवारी (ता. १५) सकाळी संबंधित जागेचा ताबा घेऊन लोखंडी टपरी उभी केली. शिवाय पवार कुटुंबातील सदस्यांना दमदाटी केली. त्यानंतर अविनाश पवार यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी १७ जणांवर गुन्हा दाखल केला आणि त्वरित कारवाई करून टपरी जप्त केली. याबाबत पोलिस हवालदार वर्षा भोसले पुढील तपास करीत आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..