चाकण एमआयडीसी रस्ते पाच महिन्यांत उखडले
आंबेठाण, ता. ५ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनमध्ये दुरुस्त केलेले अंतर्गत रस्ते पाच महिन्यांत उखडले. एमआयडीसीच्या रस्त्याच्या कामाच्या माध्यमातून केवळ ठेकेदारांना पोसले जात आहे का, असा आरोप कामगार, उद्योजक, नागरिकांनी केला आहे.
एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनमधील सावरदरी, वराळे, भांबोली आदी भागांतील रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने कामानंतर अवघ्या पाच महिन्यांत संपूर्ण रस्त्याची वाट लागली. कुठेच रस्ता सुस्थितीत राहिला नाही. अनेक ठिकाणी रस्ता उखडला असून रस्त्याला सर्वत्र खड्डेच खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांतून प्रवास करताना स्थानिक नागरिकांसह कामगारांची आणि वाहनचालकांची दमछाक होत आहे. सावरदरी येथील जवळपास दोन कोटी रुपये खर्चाचा रस्ता अवघ्या पाच महिन्यात उखडला कसा? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
वराळे, भांबोली येथील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा एमआयडीसी अधिकाऱ्यांना याबाबत सूचित केले होते. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी केवळ रस्ता पाहणीची केली आणि आम्ही ठेकेदाराला सक्त सूचना करतो, असे सांगितले. परंतु, त्यानंतर देखील ठेकेदाराने कामात अजिबात सुधारणा केली नाही.
एमआयडीसी अंतर्गत रस्त्याला गटारांची व्यवस्था नसल्याने पाणी रस्त्यावर येत आहे. त्यातच डांबरीकरण करताना अनेक ठिकाणी साफसफाई केली जात नाही. हे काम किती दिवस टिकेल ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे एमआयडीसीचे हे रस्ता दुरुस्तीचे काम म्हणजे ‘पुढे पाठ आणि मागे सपाट’ अशी अवस्था ठरत होते.
चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोन अंतर्गत येणाऱ्या वासुली, शिंदे, सावरदरी, वराळे, भांबोली, खालुंब्रे या गावाच्या क्षेत्रात असणाऱ्या एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण केले. हे काम होत असताना कारखान्याचे सांडपाणी कोठे जाईल?, पावसाचे पाणी कुठे जाईल? या बाबत अजिबात तरतूद केलेली दिसत नाही.
एकाच रस्त्याची तीनदा दुरुस्ती
वराळे-भांबोली परिसरात सिंडलर कंपनीच्यासमोर असणारा आणि ७५ मीटर रुंदीच्या रस्त्यापासून आत येणारा एक रस्ता तर सलग तीन वर्षे दुरुस्त केला जात आहे. एकाच रस्त्याची जर दरवर्षी दुरुस्ती करावी लागत असेल तर, त्या कामाचा दर्जा काय असेल? असा सवाल उभा राहत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

