आरूवस्तीत रस्त्यावर अवतरली गटारगंगा

आरूवस्तीत रस्त्यावर अवतरली गटारगंगा

Published on

आंबेठाण, ता.१२ : नागरिकांनी अडवलेले नैसर्गिक पाणी प्रवाहाचे स्रोत, रस्त्यावरच सोडलेले गटाराचे पाणी आणि जमिनीखालून गेलेल्या जलवाहिनी यांच्या एकत्रित समस्येमुळे वाघजाईनगर फाटा ते महाळुंगे इंगळे (ता.खेड) दरम्यान आरूवस्ती येथे रस्त्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणावर दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांना प्रवास करणे जिकरीचे झाले असून प्रशासनाचा कोणताही विभाग याकडे ढुंकून देखील पाहत नाही. त्यातच जलजीवन मिशन योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने जवळपास निम्मा डांबरी रस्ता खोदून खराब केल्याने या समस्येमध्ये अजूनच भर पडली आहे.
काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते; परंतु आरूवस्तीजवळ पाणी साचल्याने नागरिकांना धोकादायक स्थितीतून प्रवास करावा लागत आहे. गुडघाभर पाणी साचल्याने वारंवार अपघात होत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एकाला जीव गमवावा लागला होता. तर किरकोळ अपघात नित्याचे झाले आहेत. शालेय विद्यार्थी आणि कामगार यांना रोजच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.काही स्थानिक नागरिकांनी आणि जवळच असलेल्या प्लॉटिंगधारकांनी भराव केल्याने येथे पाणी साचत असल्याची परिस्थिती आहे. बिरदवडी (वाघजाईनगर फाटा) ते दवणेमळा रस्त्यावर आरूवस्ती येथे १०० मीटर रस्ता पूर्णपणे खचला असून या ठिकाणी गुडघाभर पाणी साठले आहे. पाऊस थांबला असला तरी ड्रेनेजचे पाणी या ठिकाणी साचत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जलजीवन मिशन योजनेतील ठेकेदाराने हा रस्ता मोठ्या प्रमाणात खोदला होता. परिणामी डांबरी रस्त्याचे ‘तीन तेरा वाजले’ आहेत.

जलवाहिनी तीन वर्षांपासून फुटलेली
दवणेमळा येथील नागरिकांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शुद्ध पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेली तीन वर्षांपासून फुटलेली आहे. लाखो लिटर पाणी वाया जात आहे; परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात.तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी म्हणतात की, आमची जलवाहिनी सुस्थितीत आहे.परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामपंचायत यापैकी
ज्यांची जबाबदारी असेल त्यांनी ही गळती तातडीने थांबवणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या या टोलवाटोलवीत हाल मात्र स्थानिक नागरिक आणि प्रवाशांचे होत आहे.

दवणेमळा येथील नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केल्यानंतर आंबेठाण, खराबवाडी ग्रामपंचायत अधिकारी, अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेतली. तसेच ठेकेदाराने तातडीने हा रस्ता ‘जैसे थे’ करून द्यावा, अशी सूचना केली आहे. या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यांचा नैसर्गिक स्रोत ज्या नागरिकांनी बंद केला आहे त्यांनी तातडीने तो सुरू करून द्यावा; अन्यथा पीएमआरडीएकडे तक्रार करून अनधिकृत बांधकामे काढावी लागतील.
- शरद बुट्टेपाटील, माजी सदस्य, जिल्हा परिषद


याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केली असून कर्मचाऱ्यांना पाठवून पाणी गळती होत आहे का, याची पाहणी करतो आणि जर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी गळती होत असेल तर तत्काळ ती दुरुस्त केली जाईल.
- प्रदीप शिंदे, साहाय्यक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

Marathi News Esakal
www.esakal.com