चाकण एमआयडीसीला कचराकुंडीचे स्वरूप

चाकण एमआयडीसीला कचराकुंडीचे स्वरूप
Published on

आंबेठाण, ता. ३१ : जगात नामवंत एमआयडीसी म्हणून ओळखली जाणारी चाकण औद्योगिक वसाहत सध्या सोयी- सुविधांच्या अभावी कचराकुंडी ठरत आहे. आजपर्यंत आडबाजूला पडणारा कचरा चक्क मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर येऊन पडत असल्याने रस्त्याला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एमआयडीसी मात्र उद्योजक आणि गुंतवणूकदारांना सोयीसुविधा देण्यात अपयशी ठरत आहे.
चाकण (ता. खेड) भागात एमआयडीसीचे चार टप्पे पूर्ण झाले असून, पाचव्या टप्प्याचे काम सुरू आहे. या उद्योगनगरीत अनेक स्थानिक उद्योजकांसह जगातील नामवंत कंपन्यांनी आपल्या उद्योगधंदे उभारले आहेत. परंतु, या उद्योगधंद्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत असून, त्यात प्रामुख्याने खराब रस्ते आणि कचऱ्याच्या समस्या आहेत. मोठी एमआयडीसी असल्याने नागरिकीकरणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, त्या प्रमाणात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा या भागात निर्माण केलेली नाही. तसेच, कचरा संकलनासाठी देखील पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह कामगारही आपला दररोजचा कचरा कामावर ये- जा करताना मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर टाकत आहेत.
नागरी वस्त्यांजवळ, वर्दळीच्या रस्त्यालगत, चौकाचौकात कचऱ्याचे ढीग साठत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सततची दुर्गंधी, त्यातून उत्पन्न होणारे डास याद्वारे गंभीर आजाराच्या समस्या वाढल्या आहेत. अशा कचऱ्याच्या ढिगावरील अन्नपदार्थ भटकी कुत्री खात असल्याने त्यांच्यापासून लहान मुले, महिला यांच्या जिवाला धोका वाढत आहे.

रस्त्यावरच १०- १५ फूट उंचीचे कचऱ्याचे ढीग
आजवर अनेक ठिकाणी मोकळ्या जागेत कचरा संकलन केला जात होता. परंतु, त्या मोकळ्या जागा आता विकसित होत असल्याने तेथील कचरा उचलून बाहेर टाकला जात आहे. त्यासाठी हक्काची जागा म्हणून रस्त्याचा वापर केला जात असून, रस्त्यावरच १०- १५ फूट उंचीचे कचऱ्याचे ढीग साठत आहेत. चार पदरी असणारा रस्ता अर्धाच वापरायला मिळत आहे अशी परिस्थिती या भागात आहे. अनेक ठिकाणी चौकात तर मोठे कचऱ्याचे ढीग असल्याने वाहनांकरिता एकच मार्गिका प्रवासासाठी मिळत आहे. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळी या कंपन्या सुटण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत असते.

कचरा संकलन प्रक्रिया अजून कार्यान्वित नाही. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला आहे तो उचलण्याच्या सूचना करतो.
- प्रकाश भडंगे, उपअभियंता, एमआयडीसी

एमआयडीसी भागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत. यामुळे परिसराचे विद्रूपीकरण तर होतच आहे, परंतु दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे आजार देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी प्रशासनाने तत्काळ या गंभीर घटनेची दखल घेऊन ठिकठिकाणी साठलेला कचरा उचलावा.
- सुरेश पिंगळे- देशमुख, उद्योजक

03471

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com