चाकण एमआयडीसीत कामगारांची सुरक्षा रामभरोसे

चाकण एमआयडीसीत कामगारांची सुरक्षा रामभरोसे
Published on

आंबेठाण, ता. २४ : चाकण औद्योगिक परिसरात अवैध धंदेवाल्यांकडून स्थानिक नागरिक आणि परप्रांतीय कामगारांना मारहाण व लुटमारीच्या घटनांत वाढ झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पोलिस चौकी आणि नव्याने सुरू झालेल्या पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरच हे प्रकार घडत असल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एमआयडीसी टप्पा क्रमांक दोन आणि पाच तसेच मावळ व खेड तालुक्याच्या काही भागांसाठी वासुली फाटा ही महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. या ठिकाणी देशाच्या विविध भागांतून आलेले कामगार स्थायिक असून, त्यांना अवैध धंदेवाल्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मटका, अवैध दारूविक्री आणि इतर बेकायदेशीर धंद्यांशी संबंधित टोळ्यांकडून धमकावून लूटमार केली जात असून विरोध करणाऱ्यांना मारहाण होत असल्याने यात स्थानिक नागरिकही भरडले जात आहेत.
या भागातील अवैध धंद्यांमध्ये परजिल्ह्यातील तसेच पिंपरी-चिंचवड, पुणे, तळेगाव दाभाडे, देहूरोड आदी भागांतून आलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर वाढला आहे. भाजीपाला बाजारालगतच पोलिस चौकी असतानाही हे प्रकार सुरू असल्याने नागरिकांत नाराजी आहे. विशेषतः गुरुवार आणि रविवारी बाजाराच्या दिवशी, तसेच पगाराच्या ५ ते १५ तारखेदरम्यान लूटमार व मारहाणीच्या घटनांत वाढ होत आहे. वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारचे अवैध प्रकार सुरू असताना पोलिस कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी उत्तर आणि दक्षिण अशी दोन पोलिस ठाण्यांची विभागणी करूनही अवैध धंद्यांवर आळा बसत नसल्याची टीका होत आहे. नागरिकांना संरक्षण देण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप करत, अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

‘पोलिस चौकी-ठाणे काय कामाचे?’
मारहाण, लूटमार आणि अवैध धंद्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “नागरिकांना संरक्षणच मिळत नसेल, तर पोलिस यंत्रणा काय कामाची?” असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

या प्रकारांबाबत मी माहिती घेतो आणि असे प्रकार घडत असतील तर १०० टक्के त्यावर कारवाई केली जाईल.
- दिगंबर सूर्यवंशी, वरिष्ठ निरीक्षक, उत्तर म्हाळुंगे पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com