शिरूरच्या पूर्व भागाला पावसाचा तडाखा

शिरूरच्या पूर्व भागाला पावसाचा तडाखा

आंधळगाव, ता. १४ : इनामगाव (ता. शिरूर) परिसराला सोमवारी (ता.. १३) सायंकाळी साडेसहा वाजता अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा बसला असून या वादळात इनामगाव नजिक दर्यापट येथील आबासाहेब कुरूमकर यांचे दोन पोल्ट्रीशेड, नितीन गवळी यांच्या गोठ्यांचे पत्रे उडून गेले तर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यंदाच्या वर्षातील पहिल्याच वळवाच्या पावसाने झटका दिल्याने शेतकरी हवालदिल झाला असून झालेल्या नुकसानीचे शासनस्तरावरून तातडीने पंचनामे व्हावेत व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी घोडगंगाचे संचालक संचालक दादा पाटील फराटे व माजी सरपंच पल्लवी घाडगे यांनी केली आहे.

वळवाच्या पावसाने मांडवगण फराटासह पिंपळसुटी, गणेगाव दुमाला, वडगाव रासाई, कुरुळी, आंधळगाव, नागरगाव, बाभुळसर बुद्रूक, तांदळी, नागरगाव या परिसराला जोरदार तडाखा दिला असून जवळपास दीडतास झालेल्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असून पिंपळसुटी येथे मोठ्या प्रमाणात गारा पडल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतही सुरळीत झालेला नव्हता. इनामगावच्या दर्यापट येथील आबासाहेब कुरूमकर यांच्या २५ हजार पक्षांच्या दोन पोल्ट्री शेडचे सिमेंटचे पत्रे उडून गेल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यांच्या शेजारील नितीन गवळी यांच्या गोठ्याची पत्रे उडून गेली. इनामगाव येथील दादासाहेब मचाले यांच्या घरावरील पत्र्यावर वीज पडल्याने नुकसान झाले.

वाऱ्याचा वेग एवढा मोठा होता की ठिकठिकाणी मोठी झाडे कोसळली. बहुतांश ठिकाणी वादळात विद्युत खांब व तारा तुटल्याने काल रात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
मांडवगण फराटा येथील रतन आढागळे यांच्या घराचे पत्रे उडून गेली तर आंधळगाव येथील रमेश गव्हाणे यांच्या नुकत्याच बांधकाम झालेल्या घरावरील पत्रे उडून गेली. आंधळगाव येथील माऊली पाटोळे यांच्या गुऱ्हाळाचे पत्रे उडून गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पिंपळसूटी येथील भानुदास चव्हाण यांच्या सौर ऊर्जा पॅनलचे गारांच्या तडाख्यामुळे नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com