मांडवगण परिसरात भगरीतून ५० महिलांना विषबाधा
आंधळगाव, ता.५ : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, इनामगाव, तांदळी, गणेगाव दुमाला, बाभूळसर बुद्रुक या गावातील सुमारे ४५ ते ५० महिलांना भगरीच्या पिठापासून बनविलेली भाकरी खाल्ल्याने विषबाधा झाली. नवरात्रोत्सव साजरा होत असताना ही घटना शुक्रवारी(ता.४) सकाळच्या सुमारास घडली.
मळमळ व उलटी होत असल्याने महिला व पुरुषांना तत्काळ श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी, इनामगाव व मांडवगण फराटा येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या या सर्व महिलांची प्रकृती स्थिर आहे.
नांद्रेमळा येथील अनेक महिलांना उलट्या झाल्या. त्यानंतर इतर गावातील महिलांना त्रास सुरू झाल्याने अनेक गावात खळबळ उडाली. शुक्रवारी सकाळी दहा ते बारा महिला रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तातडीने सर्वांवर उपचार सुरू केले. दत्तात्रेय किसन मचाले, लताबाई मचाले, दिलीप किसन मचाले, हिराबाई मचाले, संगीता ओव्हाळ, कलावती घुले, दत्तात्रेय काळे, उषा काळे, राजुबाई निंबाळकर, रेखा भालेराव, मीरा भालेराव, सीता भालेराव, रामदास भालेराव, अंजना भालेराव, गोकूळ दळवी यांना विषबाधा झाली. त्यानंतर सायंकाळी यातील अनेक महिलांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.नितीन फटाले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन न उचलल्याने संपर्क होऊ शकला नाही.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात अनेक दुकानात बनावट व मुदत संपलेल्या भगरीची विक्री झाल्यामुळे अनेक महिलांना विषबाधा झाली असल्याचा अंदाज आहे. दुकानात असलेल्या उपवासाच्या पदार्थाची अन्न व भेसळ प्रशासनाने त्वरित पाहणी करावी. या प्रकरणातील दोषी दुकानदारांवर प्रशासनाने कारवाई करावी.
- संपत फराटे, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर
भगर घेताना मुदत संपलेल्या तारखेची भगर घेऊ नये. उपवासाला तयार केलेले पदार्थ घेणे शक्यतो टाळावे.विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये आतापर्यंत सर्वात विचित्र लक्षणे पाहायला मिळाली. महिलांनी उपवासाच्या काळात घरच्या घरी पदार्थ बनवून खाण्यावर भर द्यावा.
-डॉ. अतुल सुराणा, मांडवगण फराटा, ता. शिरूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

