आंधळगाव येथे अपघातात दोघांचा मृत्यू
शिरूर, ता. ११ : न्हावरे- चौफुला महामार्गावर आंधळगाव (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (ता. ११) सकाळी सातच्या सुमाराससीएनजी पंपाजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला भरधाव पिकअप टेम्पोची धडक बसल्याने दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला.
संदीप रोहिदास मदने (वय ३२, रा. नागरगाव, ता. शिरूर) व विक्रम महादेव सकट (वय ३०, रा. आंधळगाव) असे मृत्यु झालेल्या तरुणांची नावे आहेत. मृत संदीप याचे भाऊ विकास रोहिदास मदने (रा. आंधळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी दत्तात्रेय रामचंद्र कदम (वय ३२, रा. रामलिंग, ता. शिरूर) या टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरगाव येथील मदने व सकट हे दोघे मंगळवारपासून (ता. १) करडे येथील एस. व्ही कंपनीत सिक्युरिटी म्हणून कामाला जात होते. संदीप हा शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता नागरगाव येथून आपल्या दुचाकीवरून (क्र. एम.एच. १२ एन.एस २७९६) करडे येथे कामाला निघाला होता. यावेळी चौफुल्याकडे जाणाऱ्या पिकअप टेम्पोची (क्र. एम. एच १२ एस. एक्स ४८३५) त्यांच्या दुचाकीला धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, पिकअपने दोघांना अक्षरशः शंभर फूट फरफटत नेले. जखमी अवस्थेत दोघांनाही चंद्रकांत कुसेकर व ‘सकाळ’चे आंधळगाव येथील बातमीदार प्रमोल कुसेकर यांच्यासह स्थानिक तरूणांनी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला व हातापायांना गंभीर मार लागल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी शिरूर येथील खासगी रूग्णालयात हलविले. गंभीर मार लागल्याने संदीप याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर विक्रम याला पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अपघातस्थळी काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. मांडवगण फराटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.
दीड महिन्यापूर्वीच झालेले लग्न
संदीप याच्या मृत्यूची बातमी त्याच्या गावात वाऱ्यासारखी पसरली. लग्नानंतर दीड महिन्यातच त्याचा मृत्यू झाल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. त्याच्या मागे आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. सकट याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे. नागरगाव येथे शोकाकूल वातावरणात दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर विक्रम याच्यावर आंधळगाव येथे शुक्रवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. ही दोन्ही गावे शेजारी असून दोन तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूच्या बातमीने गावकरी अक्षरशः हळहळले.