विद्युत खांबासाठी फोडला तलावाचा सांडवा

विद्युत खांबासाठी फोडला तलावाचा सांडवा

Published on

आंधळगाव, ता.१५ : आंधळगावात (ता.शिरूर) पाझर तलावाची संरक्षक भिंत बांधण्यासाठी व विद्युत खांब उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण कंपनीच्या ठेकेदारांनी लघु पाटबंधारे खात्याची कुठलीही परवानगी न घेता चक्क तलावाचा सांडवाच फोडला. या धक्कादायक घटनेमुळे तलावातील लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांसमोर तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे राहणार आहे.

शासकीय मालमत्तेचे नुकसान करून सांडवा फोडल्याच्या प्रकाराची दखल घेऊन पाटबंधारे विभाग व महसूल प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा व जबाबदार ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांसह नीलेश कुसेकर व राजेंद्र भोसले यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे पीक नियोजन विस्कळित होऊन दिवाळीच्या तोंडावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांडवा फोडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, तलावाचा सांडवा फोडून पाण्याची नासाडी होत असल्याचे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी कळवले होते. मात्र ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंधळगावात तलावाच्या परिसरात अलीकडेच सुमारे २० लाख रुपयांच्या निधीतून संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले. यावेळी संरक्षक भिंतीच्या कामासाठी अडथळा ठरत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने सांडव्यात खोदकाम करून भिंत फोडली. त्यानंतर काही दिवसांनी महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने विद्युत खांब उभारण्यासाठी सांडव्यातील भिंत पूर्णपणे फोडली.

तलाव कोरडा पडण्याच्या स्थितीत
दोन्ही ठेकेदारांनी ना स्थानिक प्रशासनाची परवानगी घेतली. ना पाटबंधारे खात्याची. परिणामी तलावातील मोठ्या प्रमाणातील पाणी वाहून गेले. रात्रीतच तलावातील पाण्याची पातळी घटली. त्यामुळे ऐन पावसाळा संपताच हा तलाव कोरडा पडण्याच्या स्थितीत आहे. या पाझर तलावावर हजारो हेक्टर शेती अवलंबून आहे. महावितरण कंपनीने निर्वी गावाकडे उच्च दाबाची विद्युत लाईन नेण्यासाठी तलावाच्या हद्दीत खोदकाम करून तीन खांब उभारले. परंतु पाण्यात खांब उभारणे शक्य नसल्याने ठेकेदाराने सांडव्यातील मुरूम काढून जागा केली.

आंधळगाव येथील तलावाच्या सांडव्याची त्वरित पाहणी केली जाईल. नुकसान झाले असेल तर संबंधित ठेकेदाराला दुरुस्तीच्या सूचना दिल्या जातील.
- रणजित धायगडे, कनिष्ठ अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग शिरूर उपविभाग

पाझर तलावावर येथील शेती अवलंबून असते. ठेकेदाराने तलावाचा सांडवा फोडल्याने दिवाळीच्या तोंडावर तलावातील पाणी कमी होत आहे.
महिनाभरात पाणीटंचाईचे संकट निर्माण होईल. संबंधितांवर त्वरित कारवाई व्हावी.
- नीलेश कुसेकर, शेतकरी, आंधळगाव (ता.शिरूर)


तलावाच्या आत विद्युत खांब उभारल्याचे ग्रामस्थांनी कळवले आहे. सदर खांब धोकादायक असेल तर तो त्वरित काढण्याच्या सूचना दिल्या जातील.
- नीलेश डहाके, कनिष्ठ अभियंता, महावितरण, वडगाव रासाई शाखा


आंधळगाव येथील पाझर तलावाचा सांडवा फोडल्याबाबत कार्यालयाला अर्ज प्राप्त झाला आहे. पाझर तलावाची पाहणी करून
कारवाई केली जाईल.
- ज्ञानेश थोरात, कनिष्ठ अभियंता छोटे पाटबंधारे विभाग, शिरूर

02436

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com