वडगाव रासाईत शिवरायांचा ४२ फूट उंच पुतळा

वडगाव रासाईत शिवरायांचा ४२ फूट उंच पुतळा

Published on

आंधळगाव, ता. २७ : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे जमिनीपासून तलवारीपर्यंत तब्बल ४२ फूट उंच आणि सुमारे ८० लाख रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. बुधवारी (ता. २४) दौंड तालुक्यातील चौफुला येथून वडगाव रासाईपर्यंत सुमारे ३० किलोमीटर अंतरावरून मूर्तीची वाहनातून काढलेली मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरली.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वात उंच अश्वारूढ शिवपुतळा म्हणून या स्मारकाकडे पाहिले जात असून, तो गावच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे. वडगाव रासाईत शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी सरपंच सचिन शेलार व शिवस्मारक समितीच्या सदस्यांनी पाठपुरावा केला.
पुतळा आकाराने भव्य असल्याने तो मुख्य चौकात आणण्यासाठी शिवस्मारक समितीच्या सदस्यांना मोठी कसरत करावी लागली. चौफुला येथून भगवे फेटे बांधून हजारो तरुणांनी दुचाकी रॅली काढत मिरवणुकीत सहभाग घेतला. पारगाव येथे सरपंच जयश्री ताकवणे, तुकाई माता भजनी मंडळ, ज्ञानोदय ॲकॅडमी व महिलांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात मूर्तीचे स्वागत केले.
आंधळगाव, कुरळी, तळईमाळ येथे ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव व रांगोळीच्या पायघड्या घालून स्वागत केले. मूर्ती उंच असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने काही ठिकाणी महावितरणकडून तात्पुरता विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. वडगाव रासाई येथील छत्रपती शिवाजी विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी भगवे फेटे, पांढरा कुर्ता परिधान करून लेझीम खेळत स्वागत केले. रात्री ८ वाजता गावातील मुख्य चौकात अश्वारूढ पुतळा यशस्वीपणे बसविण्यात आला. या स्मारकाच्या इंटेरियरचे काम दीपक माने (नगर) यांनी केले असून, अभियंता नागेश मोरे यांनी तांत्रिक जबाबदारी सांभाळली. अभियंता स्वप्नील भुजबळ व प्रशांत फराटे यांनी सुपरवायझिंग केले. या उपक्रमासाठी आमदार राहुल कुल, भाजप नेते प्रदीप कंद, मित्र परिवार, विविध खात्यांचे अधिकारी व मंत्र्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सरपंच शेलार यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत स्मारकाचा थाटात लोकार्पण सोहळा होणार असून, उर्वरित कामासाठी शिवस्मारक समितीच्या माध्यमातून लोकवर्गणी संकलन सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दृष्टीक्षेपात
-लोकवर्गणीतून उभारले भव्य स्मारक
-पुतळ्याच्या पाठीमागील बाजूस उभारणार भगवा शिव ध्वज
-सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे
-आकर्षक विद्युत रोषणाई
-तब्बल चार वर्षे सुरु स्मारकाचे काम
-दगडी बांधकामातील चौथरा ठरतोय लक्षवेधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com