भीमा नदीवरील बंधाऱ्यास गळती

भीमा नदीवरील बंधाऱ्यास गळती

Published on

आंधळगाव, ता. २८ : पारगाव व नागरगाव या दोन गावांच्या सीमेवर असलेल्या भीमा नदीवरील पारगाव (ता. आंबेगाव) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
शिरूर व दौंड तालुक्यातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा बंधारा सध्या पाणी गळतीमुळे चर्चेत आला आहे. या बंधाऱ्यावर परिसरातील अनेक गावांची शेती अवलंबून आहे. जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बंधाऱ्यावरील काही लोखंडी ढापे पुराच्या पाण्यात वाहून गेले, तर काही ढाप्यांची मोडतोड होऊन ते नादुरुस्त झाले होते. गेल्या आठवड्यात पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यावर ढापे बसविण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र मोडतोड झालेले व नादुरुस्त ढापेच बसविल्याने बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे. अद्याप सर्व ढापे अडविण्यात आलेले नाहीत.
सध्या ऊस, गहू, भाजीपाला आदी रब्बी पिके अंतिम टप्प्यात आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड झालेली असून, या पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास पिकांसाठी पुरेसे पाणी मिळणे कठीण होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. बंधाऱ्याच्या भिंतींना तडे गेले असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाटबंधारे विभागाने तातडीने बंधाऱ्याची पाहणी करून जुने ढापे काढून नवीन ढापे बसवावेत, अशी मागणी होत आहे.

नवीन ढापे देण्याची मागणी
मांडवगण फराटा येथील बंधाऱ्यासाठी शिरूर- हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार त्या बंधाऱ्यासाठी १,०५० नवीन ढापे उपलब्ध करून देण्यात आले. त्याच धर्तीवर नागरगाव- पारगाव येथील बंधाऱ्यासाठीही नवीन ढापे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

या बंधाऱ्यावर शेकडो उपसा सिंचन योजना कार्यान्वित आहेत. सध्या सुरू असलेली पाणी गळती कायम राहिल्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. उन्हाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे.
- प्रवीण रणदिवे, उपसरपंच, रांजणगाव सांडस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com